मुंबई: करोनाचं संकट असलं तरी मुख्यमंत्री म्हणून राम मंदिराच्या भूमिपूजनाला मी जाऊन येईलही. मुद्दा तो नाही. पण सोहळ्यासाठी इतक्या वर्षांपासून जे रामभक्त वाट पाहत आहेत. ज्यांची या सोहळ्याला उपस्थित राहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्यांच्यासाठी हा सर्वोच्च आनंदोत्सव आहे, त्या लाखो रामभक्तांचं काय करणार? त्यांच्या भावनेचं काय करणार?, अशी प्रश्नांची सरबत्ती करतानाच देशात करोनामुळे मंदिरांमध्ये जाण्यास सर्वसामान्यांना बंदी घातलेली आहे. मग तुम्ही राम मंदिराचं ई-भूमिपूजन करू शकत नाहीत का?, असा परखड सवाल मुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारला केला.

शिवसेनेचे नेते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली. मुलाखतीच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर परखड मतं व्यक्त करतानाच राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावरही अखेर मौन सोडले. राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणार की नाही? एक व्यक्ती म्हणून हो की नाही हे मी काहीही सांगेल. मी मुख्यमंत्री आहे, पूर्ण सुरक्षेत मी व्यवस्थित जाऊन येईलही. मुद्दा तो नाही. एखाद्या गावात मंदिर बांधायचं असेल तर मोठा जल्लोष केला जातो. लोक मंदिर निर्माणाच्या कार्यात भाग घेतात. उत्सुकता असते. चैतन्य सळसळतं. अयोध्येतील राम मंदिर हे काही सर्वसामान्य मंदिर नाही. या मंदिराला लढ्याची पार्श्वभूमी आहे. इतिहास आहे. हा जागतिक कुतुहुलाचा विषयही आहे. रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. अनेक वर्षांपासून ते या क्षणाची वाट पाहत होते. त्यांच्या भावनेचं काय करणार? लाखो राम भक्तांना राम मंदिराच्या भूमिपूजनाला येऊ देणार की अडवणार? कि कळत न कळत त्यांच्यात करोनाचा प्रसार होऊ देणार? असा सवाल करतानाच करोनामुळे आपण नागरिकांना मंदिरातही जाण्यास बंदी घातली आहे. अशावेळी तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही भूमिपूजन करू शकता. ई-भूमिपूजनही करू शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री झाल्यावर मी अयोध्येला गेलो होतो. त्यावेळी देशात करोना संसर्ग फैलावण्यास सुरुवात झाली होती. तरीही शरयूच्या किनारी आरती करण्यापासून आम्हाला थांबवलं होतं. आज तर संपूर्ण देशाला करोनाने विळखा घातला आहे. त्याचं काय? असं सांगतानाच राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण अद्याप मिळालेलं नाही. कार्यक्रमाची रुपरेषा अद्याप पाठवण्यात आलेली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम कशापद्धतीने होणार हे माहीत नाही, असं ते म्हणाले. राम मंदिराशी मी भावनेने बांधलेलो आहे. मुख्यमंत्री असतानाही आणि नसतानाही मी अयोध्येला जाऊन आलो. शिवनेरीची माती घेऊन अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर या विषयाला हवा मिळाली. तोपर्यंत हा विषय मागे पडला होता. नंतर पुढच्याच वर्षी राम मंदिराचा प्रश्न निकाली लागला आणि मी मुख्यमंत्रीही झालो. याला योगायोग म्हणा की आणखी काही म्हणा, असंही ते म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here