9 जानेवारीला मेडक जिल्ह्यातील व्यंकटपूर गावाच्या बाहेर एका दूध विक्रेत्याला एक कार जळताना दिसली. त्यानं याची माहिती ग्रामस्थांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत संपूर्ण कार जळून गेली होती. कारमधील व्यक्ती पूर्णत: जळून गेला होता. पोलिसांना कारच्या पेट्रोलची अर्धी बाटली आणि एक बॅग सापडली. पोलिसांनी कारचा नोंदणी क्रमांक तपासला. त्यावरून कार 48 वर्षीय एम. धर्मा नायक यांची असल्याचं पोलिसांना समजलं.
कार सापडलेल्या ठिकाणी रस्त्याला रेलिंग नव्हतं. त्यामुळे दरीत पडून कारला आग लागली असावी असा अंदाज पोलिसांनी बांधला. कारला आग लागली, कारमध्ये बसलेला माणूस पूर्णत: जळून गेला. मग कारजवळ पेट्रोलची बाटली कशी काय, असा प्रश्न तपास अधिकाऱ्यांना पडला. त्यामुळे संशय वाढला. धर्माची हत्या झाली असावी अशी शंका पोलिसांना आली. त्यादृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. धर्माच्या मोबाईल नंबरवरून त्याचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला आणि संपूर्ण तपासानं नाट्यपूर्ण वळण घेतलं. पोलिसांना मोबाईलचं लोकेशन गोव्यात दिसलं. पोलिसांचं एक पथक गोव्याला पोहोचलं. तिथे धर्मा जिवंत सापडला. त्यानंतर त्याला तेलंगणात आणण्यात आलं.
विम्याची रक्कम मिळवण्यासाठी मृत्यूचं नाटक केल्याची कबुली धर्मा पोलीस चौकशीत दिली. पैशांसाठी चालकाची हत्या केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. सट्ट्यामुळे कर्जात बुडाल्यानं कर्जाची परतफेड करण्यासाठी विम्याच्या पैशांचा वापर करण्याची योजना त्यानं आखली होती. यामध्ये कुटुंबीयांनीदेखील त्याची साथ दिली होती.