पंतप्रधान मोदी यांच्याकडून ज्या विकासकामांचे उद्घाटन होत आहे, ती कामं शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाली आणि आता भाजप प्रचाराच्या चिपळ्या वाजवत आहे. पंतप्रधान मुंबईत ज्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण वगैरे करणार आहेत, त्यातील बहुसंख्य प्रकल्प पालिकेत शिवसेनेची सत्ता असतानाच पुढे सरकले. शिवसेनेच्या कार्यकाळात ज्या योजनांसाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यात आली होती, नियोजन आराखडा तयार करण्यात आला, कायदेशीर अडथळे दूर करण्यात आले, त्याच सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी करीत आहेत व त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. भारतीय जनता पक्षाने या कामाचे श्रेय भलेही घेण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला सर्व काही माहीत आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.
भाजपला मुंबईच्या विकासाची चिंता कधीपासून वाटू लागली; शिवसेनेचा सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी काही तासांच्या मुंबई भेटीवर येत आहेत व या काही तासांत ते मुंबईच्या उज्वल भविष्याची पायाभरणी करतील असे सांगितले जात आहे. पण मुंबईच्या भविष्याची व भाग्योदयाची चिंता भाजपास केव्हापासून वाटू लागली हा प्रश्नच आहे. मुंबईचा भाग्योदय मराठी माणसाने त्याच्या श्रमातून घडवला व त्याच मुंबईच्या लुटीवर दिल्लीश्वरांचे इमले उभे राहिले. मुंबईचे भविष्य व भाग्योदय १०५ हुतात्म्यांनी घडवले, तो ओरबाडण्याचा प्रयत्न केला नाही तरी मुंबईवर उपकार होतील. त्यामुळे पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.
शिंदे गटावर ‘सामना’तून निशाणा
पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपने मुंबई नगरी त्यांच्या झेंडयाने सजवली आहे. त्यात कोठे तरी मिंधे गटाने त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण मगरीने बेडूक गिळावा तसा हा गट गिळला गेला आहे व मगरीच्या जबडयात जाताना बेडूक अखेरचे डराव डराव करीत आहे असेच चित्र दिसत आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबईत लावलेल्या कटआऊट्समध्ये बाळासाहेबांपेक्षा भाजप नेत्यांचे कटआऊट्स मोठे दिसत आहेत. स्वतःला बाळासाहेबांची शिवसेना म्हणवून घेणारे मिथे यावरही मूग गिळून का बसले आहेत, असा सवाल ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला.