औरंगाबाद : नुकताच वाढदिवस साजरा केलेल्या विद्यार्थिनीने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना औरंगाबादमधील सातारा परिसरात असलेल्या राष्ट्रीय विधी विद्यापीठातील वसतीगृहात घडली आहे. युक्ती सुशील बुजाडे (रा. त्रिमृर्तीनगर, जि.चंद्रपूर, ह.मु. राष्ट्रीय विधी विद्यापीठ वस्तीगृह) असं आत्महत्या करणार्‍या विद्यार्थिनीचे नाव असून सदर तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल का उचललं, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, युक्ती बुजाडे ही तरूणी चार वर्षांपूर्वी विधी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला आली होती. सध्या ती अंतिम वर्षाचं शिक्षण घेत होती. डोके दुखत असल्याने ती विद्यापीठातून रूमवर आली. तिने गोळी घेतली आणि त्यानंतर रूममधील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार तिच्या रूममधील इतर विद्यार्थिनी खोलीत आल्यानंतर समोर आला.

परभणीतील तरुणाचं टोकाचं पाऊल, शेतात दोरी घेऊन गेला अन् लिंबाच्या झाडावर आयुष्य संपवलं

युक्तीला लटकलेल्या अवस्थेत पाहून इतर मैत्रिणींनी आरडाओरड केल्याने वस्तीगृहातील कर्मचारी धावून आले. त्यांनी बेशुद्ध अवस्थेतील युक्तीला खाजगी रूग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने ही माहिती कुटुंबियांना दिली. युक्तीने आत्महत्या का केली, हे अस्पष्ट आहे. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्जेराव सानप हे पुढील तपास करत आहेत.

युक्ती सधन कुटुंबातील

युक्ती ही सधन कुटुंबातील असून तिचे वडील हे चंद्रपूर येथे आयटीआय विभागाचे संचालक आहेत. तसंच तिचे काका हे दमन येथे पोलीस दलात डीआयजी आहेत, तर भाऊ हा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. युक्ती ही तीन महिन्यानंतर विधी परीक्षा झाल्यानंतर विदेशात पुढील शिक्षण घेण्यासाठी जाणार होती. बुजाडे कुटुंबातील सर्व भावंडांमध्ये ती एकमेव मुलगी होती. तिच्या जाण्याने बुजाडे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here