पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास मुंबई गोवा हायवेवर माणगाव नजीक गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली गावाजवळ ट्रक व इको कार यांची समोरासमोर टक्कर होऊन झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला असून त्यास माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिपळूण जवळील लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या इको गाडी न MH- 48 BT8673 यांच्यामध्ये हा अपघात झाला आहे. इको व्हॅन मध्ये एकूण दहा जण होते. टक्कर इतकी जोरात होती की गाडीचा चेंदामेंदा झाला असून गाडीमधील नऊ जण जागीच ठार झाले.
या अपघातामध्ये पाच पुरुष ची महिला आणि एका लहान मुलगी असे ९ जण मयत झाले आहेत. या कुटुंबातील चार वर्षांचा चिमुरडा मात्र या भीषण अपघातामधून आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल केले आहे. मयत इसम एकमेकांचे नातेवाईक असून ते गुहागर तालुक्यातील हेदवी येथे निघाले होते. अपघातामुळे गोवा हायवे वरची वाहतूक जाम झाली होती. रायगड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे असे रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले आहे.
मुंबईतील जाधव कुटुंब अपघातात मृत्यमुखी
अपघातग्रस्त कारमधून मुंबईतील जाधव कुटुंबीय प्रवास करत होते. हे सर्वजण मालाड आणि बोरिवली परिसरात वास्तव्याला होते. नातेवाईकाच्या वर्षश्राद्धासाठी हे सर्वजण गावी निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील सर्व ९ प्रवाशी जागीच ठार झाले. या अपघाताची बातमी हेदवी येथील लोकांना समजताच गावावर शोककळा पसरली आहे. हेदवीतील काही ग्रामस्थ रायगडच्या दिशेने रवाना झाले होते.
भीषण अपघातामधून ४ वर्षांचा चिमुकला वाचला
या अपघातामधून कारमधून प्रवास करणारा चार वर्षांचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. तो या अपघातामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, त्याच्या प्रकृतीबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, एकुण अपघाताचे स्वरुप पाहता या लहान मुलाला गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता आहे.
अपघातामधील मृतांची नावे खालीलप्रमाणे
* अमोल रामचंद्र जाधव (वय ४०) हेदवी
* दिनेश रघुनाथ जाधव (वय ३६) हेदवी
* कांचन काशिनाथ शिर्के (वय ५०)
* नंदिनी निलेश पंडित (वय ३५) डावखोत
* निलेश पंडित (वय ४२) डावखोत
* अनिता संतोष सावंत (वय ५५) सावंतवाडी
* मुद्रा निलेश पंडित (वय १२) डावखोत
* लाड मामा (वय ५८) डावखोत
* निशांत शशिकांत जाधव (वय २३)
* भव्य निलेश पंडित (जखमी)