गावच्या सरपंच ते प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी असा प्रवास करणाऱ्या मोहिनी जाधव या राज्यातील पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेऊन यश संपादन केल्याने नव्या पिढीच्या समोर विशेषतः ग्रामीण भागातील महिला, विद्यार्थ्यांपुढे त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
मोहिनी भागवत यांचे पती अॅड. बापूराव भागवत यांचीही त्यांना या कामी मोलाची साथ मिळाली आहे. ‘गावातील लोकांनी माझी सरपंचपदी बिनविरोध निवड करून माझ्यावर विश्वास टाकला. त्यानंतर आई-वडील आणि सासू -सासऱ्यांचंही मला सहकार्य मिळालं. जसं यशस्वी पुरुषामध्ये स्त्रीचा हात असतो, तसंच माझ्या यशामागे माझ्या पतीचा हात आहे,’ अशा भावना यावेळी मोहिनी भागवत यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोहिनी जाधव यांचं कौतुक केलं आहे. ‘आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील मळद, ता.दौंड येथील विद्यमान सरपंच ॲड. मोहिनी बापूराव भागवत (शेलार) यांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून निवड झाली. या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी राज्यातून पाचवा क्रमांक मिळवला आहे. त्यांचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा,’ असं सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.