पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र या जागेवरून संघर्ष होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.

भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रसाने माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्यासह गणेश बिडकर आणि मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांचे नावं चर्चेत आहेत. तर महाविकास आघाडीतील तीनही पक्ष ही निवडणूक लढविण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात जोरदार राजकारण रंगलं आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात नेहमीच भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना होत आला आहे. मात्र, १९९१ साली झालेल्या पोटनिवडणुकीत वसंतराव थोरात यांच्या विजयानंतर काँग्रेसला कसब्यात गुलाल उधळण्याची संधी मिळाली नाहीये. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेसकडे ही जागा होती तर भाजप शिवसेना युतीत भाजपकडे पर्यायाने याठिकाणी काँग्रेस आणि भाजपचं लढत होत असे.
मुक्ता टिळक, लक्ष्मण जगतापांच्या मतदारसंघांची पोटनिवडणूक जाहीर, या तारखांना मतदान आणि निकाल
मात्र, आता महाविकास आघाडीत शिवसेना देखील सहभागी झाल्याने कसब्यात नक्की कोण लढणार ? यावरून आघाडीत नवा संघर्ष उभा राहिला आहे. काँग्रेसने आपण आघाडीत असताना पारंपरिकरित्या ही जागा लढवत असल्याचे सांगितले आहे. तर राष्ट्रवादीने ‘पूर्वीपासून काँग्रेस लढत आहे म्हणून आताही लढावं असा काही नियम नसतो’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या जागेवर आपली दावेदारी सांगितली आहे. तिकडे नवीनच आघाडीत आलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने देखील या पक्षने या जागेवर आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे.

‘पूर्वी आम्ही महाविकास आघाडीत नव्हतो, त्यामुळे त्यांचे जागावाटप आता लागू होत नाही. या ठिकाणी शिवसेनेने निवडणूक लढवावी अशी मागणी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पक्षाच्या आदेशानुसार निवडणुकीत काम केले जाईल.’ असे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे म्हणाले आहेत. तर ‘पूर्वीपासून काँग्रेस लढत आहे म्हणून आताही लढावं असा काही नियम नसतो’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपण इथून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी ‘भाजपने उमेदवार दिल्याने पंढरपूर, अंधेरी, कोल्हापूर येथे पोटनिवडणूक झाली आहे. त्यामुळे आम्ही कसब्यातून निवडणूक लढविण्यास तयार आहोत पक्षाचे नेते अंतिम निर्णय घेतील, असं काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे आघाडीतील तीनही पक्षांनी या जागेवर हक्क सांगितल्याने कसब्याच्या जागेवरून महाविकास आघाडीत कुरबुरी होण्याचे चिन्ह आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here