बंगळुरूच्या आरटी नगरात वास्तव्यास असणारा अबुबकर इयत्ता सातवीत शिकत होता. १३ वर्षांचा अबुबकर त्याच्या ३ मित्रांसोबत घराजवळ असलेल्या उद्यानात पतंग उडवत होता. पतंग अचानक विजेच्या खांब्याला असलेल्या तारेत अडकली. पतंग काढण्यासाठी अबुबकर घराच्या छतावर चढला. पतंग काढण्यासाठी त्यानं मांजा हातात धरला. त्यावेळी त्याचा हात विजेच्या तारेला लागला. त्याला जोरदार शॉक लागला आणि तो गंभीररित्या भाजला.
अबुबकर ८० टक्के भाजला होता. त्याला उपचारांसाठी तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रथमोपचारानंतर त्याला बॅपटिस्ट रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथून वाणी विलास रुग्णालयात पाठवण्यात आलं. मंगळवारी संध्याकाळी अबुबकरनं शेवटचा श्वास घेतला. या प्रकरणी पोलिसांनी कलम ३०४ अ अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप अबुबकरची आई सुल्ताना यांनी केला.