कल्याण: अंगात संचारलेले भूत उतरवण्यासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून तंत्रमंत्रानंतर केलेल्या बेदम मारहाणीत आजी आणि काकाचा मृत्यू झाल्याची घटना कल्याणमधील खडकपाडा परिसरात घडली. पंढरीनाथ तरे (वय ५०) आणि चंदूबाई तरे (वय ७६) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे (वय २७), विनायक कैलास तरे (वय २२) आणि मांत्रिक सुरेंद्र पाटील (वय ३५) यांच्यासह मृताच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. खडकपाडा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

मृताची पुतणी कविता तरे हिच्या अंगात दैवीशक्ती संचारत असल्यामुळे तिला पंढरीनाथ यांची पत्नी आणि कविताची आई सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे नियमित घेऊन जात असत. ढोंगी मांत्रिक सुरेंद्र याने त्यांना पंढरीनाथ आणि चंदूबाई या दोघांना भूतानं पछाडले असून, घराला त्याचा त्रास होत असून हे भूत उतरवल्यास घरात भरभराट येईल, असे सांगितले. त्यांच्या अंगातील भूत तंत्रमंत्र करून पळवावे लागेल अशी बतावणी केली. या अंधश्रद्धेला बळी पडत विनायक आणि कविता यांनी काका आणि आजीचे मन वळवून त्यांना अंगातील भूत उतरवून घेण्यास तयार केले. यानंतर पंढरीनाथ तरे यांच्या अटाळी येथील राहत्या घरातच भूत उतरविण्याची तयारी केली गेली.

२५ जुलैला दुपारी ४ वाजल्यापासून हा जीवघेणा प्रकार सुरू झाला. त्यात मृताचा अल्पवयीन मुलगादेखील सामील झाला. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चंदूबाई आणि पंढरीनाथ यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यात आली. हा अघोरी प्रकार दुपारी ४ वाजल्यापासून रात्री पावणेनऊ वाजेपर्यंत सुरू होता. मांत्रिकासह इतर तिघांनी पंढरीनाथ आणि चंदूबाई यांना मारहाण केली. या मारहाणीत या दोघांचाही अखेर दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मयताचा भाचा देवेंद्र भोईर याने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. देवेंद्र याच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी पहाटे गुन्हा दाखल केला असून, चारही आरोपींना ताब्यात घेतले आहे. तिघांना अटक केली असून, अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे, अशी माहिती खडकपाडा पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here