मानखुर्द येथील बालसुधारगृह परिसरात गतिमंद व्यक्तींसाठी शेल्टर होम असून यात लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींनाही ठेवण्यात आलं आहे. व्यवस्थापनाने दोन आठवड्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेशी संबंध साधून काही मुलांना खोकला असल्याची माहिती दिली होती. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने याठिकाणी फिव्हर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये एकूण २६८ मुलांची स्क्रिनिंग करण्यात आली. त्यातील ८४ मुलांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची करोना टेस्ट करण्यात आली.
करोनाची टेस्ट केल्यानंतर त्यातील ३० मुलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर त्यातील २ मुलांना कर्करोग आहे. या दोन्ही मुलांवर सायनच्या लोकमान टिळक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित मुलांना बीकेसीतील कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलवण्यात आलं आहे. तसंच, हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून महापालिकेकडून सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहे. अशी माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. दरम्यान, चिल्ड्रन्स होममध्ये करोनाचा फैलाव नेमका कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यात करोनामुळे काल आणखी २५७ रुग्ण दगावले असून मृतांची एकूण संख्या आता १३ हजार ३८९ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३.६५ इतका मृत्यूदर आहे. राज्यात काल दिवसभरात ९२५१ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांना राज्यातील विविध कोविड रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचवेळी दिलासा देणारी बाब म्हणजे आज ७२२७ रुग्ण करोनावर मात करून आपल्या घरी परतले आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत १८ लाख ३६ हजार ९२० जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यातील ३ लाख ६६ हजार ३६८ जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times