नेमकं काय आहे प्रकरण?
दक्षिण मुंबईतील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. सदिच्छा साने २९ नोव्हेंबर २०२१ रोजी परीक्षेला जाते म्हणून घरातून निघाली ती परतलीच नाही. तिच्या कुटुंबीयांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. जे. जे.मध्ये परीक्षेस जाते म्हणून ती घराबाहेर पडल्याने जे. जे. मार्ग पोलिसांनीही तिचा शोध घेतला. तिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता.
तांत्रिक पुराव्यांवरून तिचे शेवटचे लोकेशन वांद्रे बँड स्टॅण्ड येत होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलीस ठाण्यातही धाव घेतली होती. याबाबत हिवाळी अधिवेशनातही प्रश्न उपस्थित केला गेला. वांद्रे बँड स्टॅण्ड येथे तिने जीवरक्षक मिथू सिंगसोबत सेल्फीदेखील काढली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी मिथू याला ताब्यात घेतले. मात्र, तो चौकशीला सहकार्य करीत नसल्याने पोलिसांना न्यायालयात त्याच्या नार्को चाचणीसाठी अर्ज केला होता आणि त्याची चाचणीही करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट ९ने परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आधी मिथ्थू सिंगला अटक केली आणि त्यानंतर त्याचा मित्र अब्दुल अन्सारी याला पकडले. मिथ्थू आणि अब्दुल यांच्यामध्ये मोबाइलवरून सांभाषण झाले होते. त्यामध्ये दोघेही डॉ. सदिच्छाबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील बोलत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. डॉ. सदिच्छा बँड स्टँड येथे भेटल्यानंतर काही वेळाने मिथ्थू पाण्यात बुडू नये यासाठी वापरली जाणारी लाइफ रिंग घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. इतकंच नाही, तर तिला भेटल्यानंतर तो घरी आला आणि मोबाइलवरून तिला इंस्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली. याबाबत सुरुवातीला तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता. मात्र आता आपण डॉ. सदिच्छाची हत्या केल्याचे त्याने कबुल केलं आहे.