म.टा. प्रतिनिधी, नगरः आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये करोनाचे रुग्ण नसले तरी प्रसार माध्यमांतील बातम्या वाचून ग्रामस्थांच्या मनात भितीचे वातावरण आहे. लोकांच्या मनातील ही भिती दूर करण्यासाठी आणि विशेष म्हणजे लोकांना घरातच गुंतवून ठेवून बाहेर पडणे टाळण्यासाठी गावाने एक भन्नाट उपाय हाती घेतला आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर दररोज एक तास संविधानाचं पारायण होणार आहे तर प्रत्येक नागरिक घरात दिवसातून तीन वेळा आपापल्या धार्मिक ग्रंथाचे वाचन करणार आहेत.

राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी या उपक्रमाची माहिती दिली. हिवरे बाजारामध्ये हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. तेथे हनुमान, राम, लक्ष्मण, सीता, विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा लॉकडाउन संपल्यानंतर करण्यात येणार आहे. सध्या करोनाचे संकट आहे. त्यावर मात करण्यासाठी यावर आधारितच उपक्रम घेतला आहे. गावात दररोज एक तास भारतीय संविधानाचे वाचन ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार आहे. याशिवाय प्रत्येकाने स्वतःच्या घरात सकाळ, दुपार, संध्याकाळ आपापल्या धार्मिक ग्रंथाचे पारायण करायचे आहे. यामध्ये विशेषतः साईचरित्र, हनुमान चालीसा, रामरक्षा, ज्ञानेश्वरी गाथा, गुरुचरित्र, ग्रामगीता, बौध्दतत्त्वज्ञान, कुराण, बायबल, नवनाथगाथा यांचे पारायण होणार आहे. यातून मनोबल वाढण्याचा प्रयत्न होणार असून ताणतणाव दूर होऊन आनंद मिळेल व कुटुंबातील स्नेहभाव वाढेल. मुख्य म्हणजे निष्कारण बाहेर फिरणेही कमी होईल.

गेल्या चार महिन्यांपासून करोनाच्या नियमांचे अतिशय काटेकोर पालन ग्रामस्थांनी केले. त्यामुळे आजपर्यंत एकही करोना बाधित रुग्ण आढळला नाही. सध्या करोनाने जगभर थैमान घातले बातम्या पाहून सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाचा प्रादूर्भाव ग्रामीण भागात सुद्धा झपाट्याने सुरु झाला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी हिवरे बाजार येथे या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यात सर्वत्र भक्तिमय वातावरण असते. अनेक गावांत सार्वजनिक अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात. अनेक घरांत महिनाभर धार्मिक ग्रंथांचे पारायण केले जाते. याचा पद्धतीचा वापर करोनासंबंधीच्या उपाययोजनांसाठी करण्यात येणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here