पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. मी आणि भाजप नेते दोघेही केंद्रीय नेतृत्वाशी बोललो आहे. पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्याची विनंती केली आहे. तसंही केंद्रीय नेतृत्वाला काही सांगण्याची गरज नसते. त्यांचा कॅमेरा व्यवस्थित सगळीकडे सुरू असतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पंकजा मुंडे यांच्याकडे अजून ३० ते ४० वर्षे आहेत. त्यामुळे त्यांचं कर्तृत्व उजळत राहो, हीच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहे. आता गिफ्टचं म्हणाल तर मी चॉकलेट आणलं आहे. त्यांना ई-चॉकलेट पाठवेल, असं ते मिश्किलपणे म्हणाले.
यावेळी त्यांनी पुण्यातील परिस्थितीवरही भाष्य केलं. पुण्यात गंभीर परिस्थिती आहे. चार महिन्यानंतर का होईना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील करोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली पाहिजे. ही बैठक घेताना कद्रूपणा करू नये. विरोधी आमदारांनाही बैठकीला बोलवावं, असं सांगतानाच पुण्यातील रुग्णसंख्या वाढण्याचं भाकीत केलं जात आहे. आपण सर्व मिळवून हे भाकीत खोटं ठरवू. त्यात सरकारची मोठी भूमिका राहिल, असंही ते म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात यावं. मुंबईत जास्तकाळ थांबू नये. अजितदादा अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावाही त्यांनी केला.
पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवरही टीका केली. ही मुलाखत म्हणजे निव्वळ मॅच फिक्सिंग आहे. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि त्याला मुख्यमंत्री उत्तरे देणार. तुमचे केस वाढले… असले प्रश्न विचारणार. राऊत हे स्तुतीपाठक आहेत. त्यांनी मुलाखत घेण्याऐवजी इतरांनी घ्यायला हवी. चार महिन्यानंतर मुख्यमंत्री मीडियासमोर आले आणि तेही सामनासमोर आले, असा चिमटाही त्यांनी काढला. सध्या राज्यात तीन पक्षाचा शो सुरू आहे. उत्तम शो आहे. त्यांना हा शो करण्याचं स्वातंत्र्य आहे. अशोक चव्हाण यांनी आधी रागवायचं आणि माझं काही म्हणणंच नाही, असं दुसऱ्या दिवशी सांगायचं. ठिक आहे. तुमचं काही म्हणणं नाही, तर आमचंही काही म्हणणं नाही, असंही ते म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times