Nagpur ZP Pension Scam : नागपूर जिल्हा परिषदेच्या पारशिवनी पंचायत समितीच्या पेंशन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत 30 बोगस खाती समोर आली आहेत. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (Economic Offenses Wing) 24 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

घोटाळ्यातील मुख्य आरोपी सरिता नेवारेसह खैरकर नामक लेखाधिकारी यालाही अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी मुख्य सूत्रधार सरिता नेवारे हिच्याकडून सोन्याचे दागिने, फर्निचर, ट्रक, स्कार्पिओ कार जप्त केली आहे. हा मुद्धेमाल 60 ते 70 लाख रुपयांच्या घरात आहे.

इमारतही होणार जप्त!

इमारत जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या इमारतीची किंमत बाजारभावानुसार 60 लाख रुपयांच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय, नेवारे हिने मुलीच्या खात्यावर वर्ग केलेली दोन लाख 30 हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर इमारत जप्तीची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. आता पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा अधिकाऱ्यांच्या पाठीमागे लागणार आहे. या चौकशीत तत्कालीन सहा बीडीओंचा (BDO) समावेश आहे. यांच्यासह गट शिक्षणाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही पोलिसांकडून जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात येणार आहे.

लोकल ऑडिट पूर्ण

सीईओ सौम्या शर्मा यांनी तेराही तालुक्यांतील पेंशन वाटपसंदर्भात लोकल ऑडिट करण्याच्या सूचना देत ऑडिट पूर्ण झाल्याचे सांगितले.

news reels New Reels

असा झाला होता घोटाळा…

नागपूर जिल्हा परिषदेत एका कनिष्ठ महिला लिपिकाने मृतांच्या नावाची पेंशन जवळच्या मंडळींच्या बँक खात्यात वळती करुन कोट्यवधींचा घोटाळा केला. जिल्हा परिषदेच्या इतिहासामधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा (Biggest Scam In Nagpur ZP) असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. या महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करुन चौकशी समिती गठित करण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु असल्याचे सांगण्यात येते. आरोपी महिलेकडे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेंशनची प्रकरणे हाताळण्याचे काम होते. सेवानिवृत्तीनंतर मृत पावलेले कर्मचारी ‘हयात’ (जिवंत) असल्याचे दाखवत त्यांची पेंशन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात वळती करत होत्या.हा प्रकार गेल्या सात ते आठ वर्षांपासून सुरु असून घोटाळ्याची रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून महिला कर्मचारी हे रजेवरही गेली. त्यामुळे तिचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे वर्ग करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्याला मोठा संशय आला. त्यामुळे हे प्रकरण समोर आले होते.

ही बातमी देखील वाचा…

Nagpur : जुनी पेंशन नाकारणे ठरु शकते टेंशन? मतविभाजनाचा धक्का कोणाला? प्रस्थापितही धास्तावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here