चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव परिषद शाळेतील ११ विद्यार्थ्यांना सहलीला गेल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. वडोली मार्गावर असलेल्या इको पार्कमध्ये ही सहल नेण्यात आली होती. सहलीत एकूण ५२ विद्यार्थी होते. पार्कमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना खाण्यासाठी चिकन देण्यात आलं. याच चिकनमधून विषबाधा झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांना गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जात असताना याची माहिती पालकांना देणं गरजेचं होतं. मात्र शिक्षकांनी आम्हाला ही माहिती दिली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मुलांना विषबाधा झाल्याचं समजताच पालकांनी रुग्णालय गाठलं आणि शाळा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

अर्धांगिनीचा विरह सोसेना! पत्नीच्या तेराव्याला पतीचा मृत्यू, लेकरांना जीवनमंत्र देत बाबांनी जीव सोडला

काय म्हणाले मुख्याध्यापक ?

याबाबत शाळेचे मुख्याध्यापक पेन्दोर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुलांनी जेवण केलं आणि त्यानंतर ते गोल फिरणाऱ्या चकरीवर बसले. त्यामुळे त्यांना मळमळ आणि उलट्या झाल्या. मुलांची प्रकृती आता स्थिर आहे.

रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांची नावे

समीरा वेलादी, संस्कार झाडे, रवली शेंडे, आरती आत्राम, टिना बोरकुटे, खुशाल बोरकुटे, भारत झाडे, रुद्रमनी वेलादी, क्रिश वेलादी आणि आदित्य वेलादी या विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार जीवन राजगुरू रुग्णालयात पोहोचले असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here