Nashik Shubhangi Patil : ज्या काँग्रेसने (Congress) तुम्हाला भरभरुन दिलं, तिसरी पिढी तुमची खात होती, तरी तुम्ही त्याच काँग्रेसला गाफील ठेवत तुम्ही दगाबाजी केली, काँग्रेसचे जर होता तर तुम्ही एबी फार्म का भरला नाही, मग आता तुम्ही काँग्रेसचे आहात असं कस म्हणता, जे पक्षाला झाले नाहीत ते जनतेला काय होणार असे म्हणत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) उमेदवार शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. 

नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) या जळगावात (Jalgoan) आल्या आहेत. मला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे, त्यामुळे या निवडणुकीत विजयासाठी आपण महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे जात असल्याचे शुभांगी पाटील यांनी सांगितले आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदासाठीचे चेहरा होते, परंतु असं होऊ नये म्हणून भाच्याने ही खेळी केली. मात्र जे बाळासाहेब थोरातांचे झाले नाहीत ते जनतेचे काय होतील, असा हल्लोबोलही शुभांगी पाटील यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर केला आहे.

विजय माझाच होईल : शुभांगी पाटील

“राजा का बेटा राजा नही हो सकता, जिसमे काबिलीयत है, वही राजा हो सकता है, मी सामान्य कुटुंबातील आहे, त्यामुळे जनतेची मला पंसती असून मला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे, असे म्हणत विजय माझाच होईल,” असा टोला नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवार शुभांगी पाटील यांनी त्यांचे विरोधक अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना लगावला आहे.

जळगाव दौऱ्यावर असलेल्या सुधीर तांबे यांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी भेट घेतली, यावर शुभांगी पाटील यांना विचारले असता, अतिथी देवो भव: याप्रमाणे तांबे यांची भेट घेतली असेल, भेटीचं आपल्या काही वाटत नाही, पण महाविकास आघाडीतील पक्ष हे माझ्याच पाठीशी आहेत. त्यामुळे विजय आपलाच होईल असे स्पष्टीकरण सुद्धा यावेळी शुभांगी पाटील यांनी दिले.

news reels New Reels

प्रचाराचा धुराळा जोरात…

महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केल्यानंतर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा प्रचार दौरा जोरात सुरु आहे. कालच त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रचाराचा नारळ फोडला. आता त्या जळगाव जिल्ह्यातील अनेक भागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना देखील मतदारांचा वाढता पाठिंबा आहे. त्यामुळे नाशिक पदवीधारची निवडणूक हि चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे येत्या 30 जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here