बीड : राज्यभरात सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारालाही सुरुवात झाली आहे. याच दरम्यान भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी गेवराई येथे जाहीर सभा घेतली. मात्र यावेळी व्यासपीठावर घडलेल्या एका प्रसंगाची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

किरण पाटील यांच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या जाहीर सभेत सुरुवातीला स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर भाषणासाठी पंकजा मुंडे यांचे नाव पुकारण्यात आले. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवत आधी मी भाषण करतो, मग तुम्ही भाषण करा, असं सांगितलं. त्यावर पंकजा मुंडे यांनी असा प्रोटोकॉल नाही. प्रोटोकॉलनुसार अध्यक्षांचं भाषण शेवट व्हावं, त्यामुळे मी आधी भाषण करते, असं म्हटलं. मात्र अखेर बावनकुळे यांनी स्मितहास्य करत आपल्या भाषणाला सुरुवात केली आणि पंकजा मुंडे पुन्हा आपल्या जागी जागून बसल्या.

मुख्यमंत्र्यांचं एकाच वेळी चार पक्षांना खिंडार, मुंबईत ४० नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाषण संपल्यानंतर पुन्हा पंकजा मुंडे भाषणासाठी आल्या. यावेळी त्यांनी १५ मिनिटांच्या आपल्या भाषणातून भाजप उमेदवार किरण पाटील यांना मतदान करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. पंकजा मुंडेंचं पूर्ण भाषण संपेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात चुरस

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील, वंचित बहुजन आघाडीचे माने कालीदास शामराव यांच्यासह अपक्ष उमेदवार अनिकेत भीमराव वाघचौरे पाटील, प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर), आशिष (आण्णा) अशोक देशमुख, कादरी शाहेद अब्दुल गफुर, नितीन रामराव कुलकर्णी, प्रदीप दादा सोळुंके, मनोज शिवाजीराव पाटील, विशाल (विक्की) उद्धव नांदरकर, सुर्यकांत संग्राम विश्वासराव, संजय विठ्ठलराव तायडे, ज्ञानोबा चिमनाजी डुकरे या उमेदवारांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here