लॉकडाऊनमुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आहे. त्यांना अहोरात्र सेवा बजावावी लागत आहे. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव पोलीस दलात झाल्याचे पाहायला मिळत आहे. वडाळा टी टी पोलिस ठाण्यातील काॅन्स्टेबल सोहेल शेख यांचा ४०दिवसांपूर्वी करोना चाचणीचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. त्यानंतर शेख यांना सेंट जाॅर्जेस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या कुटुंबियांची देखील चाचणी करण्यात आली. यातील त्यांची ४० वर्षीय बहिण आणि ६३ वर्षाची आई यांच्या चाचणीचा अहवालही पाॅझिटीव्ह आला. त्यामुळे या दोघींनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार दरम्यान प्रकृती अधिकच खालावत गेल्याने जून महिन्यात शेख यांची आई आणि बहिणीचा मृत्यू झाला. त्यानंतर शेख यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने त्यांना गुरू नानक रूग्णालयात हलविण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना सुरूवातीला उपचाराला प्रतिसाद मिळाला परंतु नंतर शेख यांचीही तब्येत बिघडत गेली. रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने पोलिस कुटुंबीयांमध्ये चिंता आहे.
वाचाः
गेल्या चार महिन्यात ८ हजार २३२ पोलिसांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यातील ७ हजार ३७१ कॉन्स्टेबल व ८६१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांना करोनामुक्त ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सुविधा पोलिसांना पुरवण्यात येत आहेत. शिवाय करोना चाचणी, आरोग्य चाचणी असे उपक्रमही घेतले जात आहेत. मात्र, अद्याप करोनाने पोलिसांची पाठ सोडलेली नाही. मुंबईत करोनाग्रस्त पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times