मुंबई : वडाळा येथील अॅण्टॉप हिल परिसरात राहणाऱ्या नऊ महिन्यांच्या मुलाचा गोवराने मृत्यू झाल्यानंतर मुंबईमध्ये दुसऱ्या दिवशी आणखी एका बाळाचा या आजाराने बळी घेतला. ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील सहा महिन्यांच्या मुलीचा शुक्रवारी गोवराने संशयित मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.मृत्यू निश्चित अहवाल समितीच्या अहवालानंतरच बालकाचा मृत्यू गोवरामुळे झाला होता का, याबाबत स्पष्टता येईल, असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे गोवरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २३ झाली आहे. यातील तीन मृत्यू हे मुंबईबाहेरील आहेत. ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील सहा महिन्यांच्या मुलीला ९ जानेवारी रोजी ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास होऊ लागला. ११ जानेवारी रोजी तिच्या शरीरावर पुरळ आले. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पालकांनी १२ जानेवारी रोजी पालिका रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. तिची श्वसनक्रिया निकामी झाल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. आवश्यक ते सर्व उपचार करूनही मुलीची प्रकृती खालावत गेली. २० जानेवारी रोजी रात्री ११ वाजता तिचा मृत्यू झाला. या मुलीला लशीची कोणतीही मात्रा देण्यात आली नव्हती. महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या ६५पैकी ५६ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. पाच रुग्णांना प्राणवायू यंत्रणा लावण्यात आली आहे. चार रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here