कर्जाची रक्कम वसूल करण्याचे काम श्रीकांत तायडे करतात. तायडे बिच्छूटेकडी भागात दर बुधवारी कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी जातात. घटनेच्या दिवशीसुद्धा बुधवारच होता. बिच्छूटेकडी परिसरातील महिलांकडून त्यांनी कर्ज वसुलीची रक्कम घेतली व ते निघाले. त्यावेळी आरोपी त्यांच्या मागावर होते. लुटारुंनी भाग्योदय कॉलनीजवळ दुचाकी आडवी करुन तायडे यांना अडवले. राहुल श्रीरामेने तायडेंच्या मांडीत चाकू मारला त्यानंतर आतिफ व त्याच्या अल्पवयीन सहकाऱ्याने २ लाख ३० हजार रुपये असलेली बॅग हिसकावली व दुचाकीने पळाले.
घटनास्थळापासून काही अंतरावरच लुटारूंची दुचाकी घसरली. त्यावेळी राहुल श्रीरामेच्या पायातील एक बूट घटनास्थळावर पडला होता. आपल्याला कोणी पकडू नये म्हणून हे तिन्ही लुटारु बूट सोडून पळून गेले होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना बूट सापडला. त्याच्या आधारे तपास सुरू झाला. सोशल मीडियावर राहुल श्रीरामेचे काही व्हिडीओ पोलिसांना दिसले. त्यामध्ये त्याच्या पायात तोच बूट असल्याचा पोलिसांनी पाहिला.
घटना घडल्यापासून तिन्ही आरोपी रोख घेऊन शहरातून पसार होते. जवळ असलेली संपूर्ण रोख उडवल्यानंतर आरोपी शहरात परतल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, राजापेठ पोलिसांनी त्यांना पकडले आहे. ही रक्कम घेऊन सुरूवातीला नागपूर व नंतर एक महिना मुंबईत हे तिघेही थांबल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी या व्यतिरिक्त अजून काही गुन्हे केले का? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत.