सिंधुदुर्ग : केंद्रीय सूक्ष्म,लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या संवादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. कॉलेजमधील युवकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपण कसे घडलो. याचीही त्यांनी खुमासदार शैलीत माहिती दिली. ‘प्राथमिक शाळेत पाचवी-सहावीत असताना गणिताचा नवीन संग्रह केला होता.गणित विषयात टॉपर होतो. तर मराठीत पाचही डिव्हिजनमधून पहिला येत होतो. गणितच्या शिक्षिका घरी बोलावून गणिताचा नवीन संग्रह माझ्याकडून जाणून घेत होत्या आणि नंतर तो धडा शिकवत होत्या. कारण तो धडा शिकविण्यापूर्वीच मी दोन स्टेप सर्वांपुढे असायचो. शाळेत फारसे मित्र नव्हते, मात्र होते ते उपयोगी पडणारे होते, असे सांगताना बुद्धिमत्ता,वैचारिक ताकद आणि नशिबामुळे मी मोठा झालो. या सर्वांमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांनीच मला घडवले आहे. त्यांनीच मला परिपक्व बनवले आणि म्हणून उद्योग-व्यवसायात आणि राजकारणात मी यशस्वी ठरलो. माझ्या यशाचे सर्व श्रेय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जाते’, असे नारायण राणे यांनी म्हटले.

कासार्डे हास्कुल येथे विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वतःच्या यशाचे अनेक पैलू मांडले. ‘माझ्या यशात खडतर प्रयत्न आहेतच मात्र त्याचबरोबर चांगले तेच मी स्वीकारत गेलो. चांगले मित्र, माणसं जोडत गेलो. आणि निर्व्यसनीपणा हा माझ्या यशाचे सातत्य टिकवण्यास उपयोगी ठरला. मी माझ्यातील विद्यार्थी कधीही मरू दिलेला नाही. चांगल्या गोष्टी, चांगले शब्द, चांगली वाक्य आणि चांगली माणसं मी नेहमीच संग्रही करत राहिलो. त्यांच्याकडून शिकत राहिलो. मी आजही विद्यार्थी म्हणूनच आहे. चांगल्या गोष्टी मी प्रत्येकाकडून शिकत असतो. विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टींची सांगड घालावी. अभ्यासाचा वेळ आणि वाचनाचा वेळ कायम राखून ठेवावा, दर दिवशी अभ्यास,आणि दर दिवशी वाचन वेगवेगळ्या विषयांवर झालेच पाहिजे. यशस्वी होण्यासाठी या मेहनतीला आणि परिश्रमांना दुसरा पर्याय नाही ते तुम्हाला करावेच लागणार’, असेही नारायण राणे यांनी सांगितले.
संजय राऊतांना खासदार करण्यासाठी मी ‘सेटिंग’ लावली, पैसा खर्च केला: नारायण राणे

आयपीएस बनलेली वेंगुर्ले मधील मुलगी भेटली तेव्हा अभिमान वाटला

यशाचे उदाहरण देताना आयपीएस झालेली वेंगुर्ले तालुक्यातील एका मुलीने आपल्याला मुंबई रेल्वे स्टेशनवर भेट घेतली. आपल्या जिल्ह्यातील एक मुलगी अधिकारी बनली याचा मला अभिमान वाटला.त्या मुलीबद्दल मला गर्व आहे. तुम्ही सुद्धा असेच यशस्वी बना आयएस आयपीएस किंवा उद्योजक बनुन माझ्यासमोर याल तेव्हा मला तुमचा आणखीनच अभिमान वाटेल.

…होय ‘तो’ माझा वीक पॉईंट आहे-

केंद्रीय मंत्री राणे यांनी दिली कबुली

माझ्या जीवनात मी यशाची सगळी शिखरं पार केली.अनेक कष्टातून स्वतःला घडवत गेलो. गरीबीचे अनेक चटके भोगले. कदाचित त्यामुळे मनाविरुद्ध,अन्यायाविरुद्ध राग तिटकारा माझ्या मनात कायम राहील. तसाच राग, चीड माझ्यावर चुकीच्या पद्धतीने विरोधक टीका करतात तेव्हा येते. ती मला सहन होत नाही. खरं म्हणजे हा माझा वीक पॉईंट आहे. चुकीच्या पद्धतीने विरोधक जेव्हा टीका करतात तेव्हा माझ्यावर संयम राहत नाही ही वस्तुस्थिती आहे, अशी कबुली नारायण राणे यांनी दिली.

…तर उद्धव आणि रश्मी ठाकरे हे संजय राऊतांना चप्पलेने मारतील; नारायण राणेंचा खळबळजनक दावा

१५ रुपये महिना पगारावर पेपर टाकत होतो

शाळा शिकत असताना वृत्तपत्राची पेपर टाकण्याची लाईन मी चालवत होतो. बिल्डिंगमध्ये जाऊन घरोघरी पेपर टाकत होतो. त्यावेळी पंधरा रुपये महिना पगार मला दिला जात होता. पेपर टाकून येणाऱ्या पैशातून मी शाळेत लागणारे खर्च भागवत होतो, असे नारायण राणे यांनी सांगितले.

..म्हणून मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले

मुख्यमंत्री झालो तेव्हा कलेक्टर,अधिकारी, डॉक्टर, इंजिनीयर अशा वेगवेगळ्या स्तरांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यावेळी लक्षात आले की आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही व्यक्ती ना आयएस आयपीएस अधिकारी, ना डॉक्टर ,ना इंजिनियर तेव्हाच मी संकल्प केला आणि पहिले इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केले. आता मेडिकल कॉलेज सुरू केले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलं इंजिनीयर आणि डॉक्टर बनू लागली आहेत अधिकारी बनू लागली आहेत, याचा मला अभिमान वाटतो समाधान वाटते. तुम्हीसुद्धा असाच संकल्प करा आणि यश मिळेपर्यंत थांबू नका, असे आवाहन यावेळी मंत्री नारायण राणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here