मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळं आपल्या नेत्याचा हा वाढदिवस शिवसैनिकांसाठी निश्चितच मोठा आहे. दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक व हितचिंतकांची ‘मातोश्री’ निवासस्थानी रीघ लागते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी वेळीच या संदर्भात आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आजही शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनातून वाढदिवस साजरा करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
करोना संकटामुळे मी आज वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे कार्यालय किंवा मातोश्री निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करू नका. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, यासारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
जनतेच्या शुभेच्छा मी करोनायोद्ध्यांना समर्पित करतो, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू ये, त्याचप्रमाणे जाहीरात फलकही लावू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही २२ जुलै रोजी वाढदिवस झाला. करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी कोणत्याही सोहळ्याशिवाय हा वाढदिवस साजरा केला. तसं आवाहन त्यांनी आधीच केलं होतं. हितचिंतक व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
वाचाः
दरम्यान, राज्यात करोनाचा आकडा वाढत असताना आरोग्य प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे. अद्याप राज्यातील मृत्यूदर कमी होऊ शकलेला नाहीये. काल राज्यात २६७ जणांनी जीव गमावला आहे तर एकूण मृतांची संख्या १३ हजार ६५६ इतकी झाली आहे. राज्यात सध्या ३.६३ टक्के इतका मृत्यूदर आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात करोना रुग्ण सापडत आहेत. कालही नऊ हजारांच्यावर करोनाबाधित रुग्णांची नोंद झआली आहे. या रुग्णांना राज्यातील विविध कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी करोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. काल राज्यात तब्बल ६ हजार ०४४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण २ लाख १३ हजार २३८ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर एक टक्क्यानं वाढ होऊन ५६. ७४ इतका झाला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times