Maharashtra Pandharpur News: महाराष्ट्र केसरीच्या (Maharashtra Kesari 2023) माती गटातील अंतिम लढतीत पंचाच्या निर्णयानंतर वाद निर्माण झाला आहे. यानंतर या वादाशी संबंधित पैलवान महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) आणि पैलवान सिंकदर शेख (Sikandar Shaikh) हे भीमा सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेल्या भीमकेसरीच्या मातीत पुन्हा झुंजताना दिसणार असून दोघेही पंजाब येथील पैलवानांशी लढणार आहेत. 

खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भीमा केसरी कुस्त्यांचे आयोजन केले आहे. टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर मोठा कुस्तीचा आखाडा बनविण्यात आला असून पाच हजार प्रेक्षक बसू शकतील अशी भव्य गॅलरी देखील उभारण्यात आल्याचे कारखान्याचे अध्यक्ष विश्वजित महाडिक यांनी सांगितले. 

राज्यभरातून जवळपास 400 पेक्षा जास्त पैलवानांनी या स्पर्धेसाठी नवे नोंदवली असली तरी 5 कुस्त्या या महत्वाच्या असणार आहेत. या कुस्त्यांची 9 लाखांची बक्षिसे आणि चांदीच्या गदा दिल्या जाणार असून भीमा केसरीसाठी सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यात लढत होणार आहे. 

या लक्षवेधी लढतींकडे असणार लक्ष

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावर बोट ठेवत सिकंदरच्या बाजूने सोशल मीडियात खूप मोठे ट्रोलिंग झाल्याने सिकंदराच्या कुस्तीकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे. भीमा साखर केसरीच्या गदेसाठी महान भारत केसरी माऊली जमदाडे आणि माजी महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख हे दोन मल्ल झुंजणार आहेत. भीमा कामगार केसरीसाठी मुंबई महापौर केसरी गणेश जगताप आणि पैलवान अक्षय शिंदे यांच्यात लढत होणार आहे. भीमा वाहतूक केसरीसाठी यंदाचा उपमहाराष्ट्र केसरी ठरलेला महेंद्र गायकवाड आणि पंजाब येथील गोरा अजनाला यांची झुंज प्रेक्षणीय ठरणार आहे. भीमा सभासद केसरीसाठी नॅशनल गोल्ड मेडलिस्ट अक्षय मंगवडे आणि संतोष जगताप यांच्यात लढत होणार आहे . 

news reels New Reels

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पंचांच्या निर्णयावरून वाद निर्माण झाल्याने भीमा केसरीसाठी कोल्हापूर , पुणे आणि इतर ठिकाणाहून अनुभवी पंच येणार असून या कुस्त्यांच्या स्पर्धेसाठी कुस्ती क्षेत्रातील अनेक नामवंत मल्ल आणि राजकीय मंडळी हजेरी लावणार आहेत. भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कै भीमराव महाडिक हे स्वतः देखील नामवंत मल्ल होते. गेले दोन तीन वर्षे कोविड काळ असल्याने भीमा सहकारी साखर कारखान्यावरील या मानाच्या कुस्ती स्पर्धा झाल्या नव्हत्या. त्यामुळे 24 जानेवारी रोजी होणाऱ्या या जंगी कुस्त्यांच्या स्पर्धेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यातील सर्वात लक्षवेधी लढत भीमा केसरीसाठी होणार असून पैलवान सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्रसिंह अजनाला यांच्यातून भीमा केसरी ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here