म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड: शहरातील शिवाजीनगरमध्ये एका २९ वर्षीय विवाहितने शनिवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन रविवारी सासरच्या सहा जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत विवाहितेला विजया (वय पाच) व वेदांत (वय दोन), अशी दोन मुले आहेत. कविता योगेश जंजाळ (रा. चिंचपूर, हमु शिवाजीनगर, ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

योगेश तेजराव जंजाळ (पती), तेजराव भाऊराव जंजाळ (सासरा), गंगुबाई तेजराव जंजाळ (सासू), प्रियंका जंजाळ (नणंद), अश्विनी विशाल उबरहंडे (नणंद), विशाल उबरहंडे (नंदोई, सर्व रा. सिल्लोड), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश जंजाळ हा आपल्या कुटुंबासह शिवाजीनगर येथे राहतो. शनिवारी दुपारी विष प्राशन केल्याने त्यांनी पत्नीला तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती खालवल्याने येथे हलवण्यात आले. या दरम्यान शनिवारी रात्री विवाहितेचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत विवाहितेचा भाऊ राजेंद्र पोपटराव पवार (रा. किन्ही, ता. सोयगाव) यांनी सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे. सात वर्षांपूर्वी कविताचा विवाह योगेशसोबत झाला. त्यानंतर दोन वर्ष सासरच्या मंडळींनी चांगले वागवले. त्यानंतर प्लॉट घेण्यासाठी माहेरातून दोन लाख रुपये आण म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ करत होते, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अंधारे हे करीत आहेत.

पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करून अटक होत नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही, तसेच मृतदेहही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने उपजिल्हा रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांनी तत्काळ गुन्हा दाखल करत संशयित आरोपी पतीला अटक केल्याने नातेवाईक शांत झाले. मयत विवाहितेवर चिंचपूर येथे तणावपूर्ण वातावरणात पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here