Weather In India: येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम हिमालयाच्या भागातही जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. 

भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान अरबी समुद्रापासून पश्चिम हिमालयाच्या प्रदेशात जास्त आर्द्रता असलेल्या अॅक्टिव वेस्टर्न डिस्टर्बंस हळूहळू पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. आज पश्चिम हिमालयीन भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यानंतर 24 ते 26 जानेवारी दरम्यान तीव्र होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात 24 आणि 25, तर उत्तराखंडमध्ये 25 आणि 26 जानेवारीला मुसळधार बर्फवृष्टी होईल.

महाराष्ट्रात ऐन थंडीत पावसाचा इशारा 

राज्यात सातत्यानं हवामानत बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Wave)  तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या हवामानातील चढ-उताराचा नागरिकांना त्रास होत आहे. तसेच याचा शेती पिकांवर (Agriculture Crop) देखील परिणाम होताना दिसत आहे. अशातच हवामान विभागाकडून (Meteorological Department ) 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान, राज्यात पावसाचा (Rain) अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती  पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी ट्वीट करुन दिली आहे. 

कुठे पाऊस, तर कुठे बर्फवृष्टीचा इशारा

23 जानेवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड, महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. 24 जानेवारीला मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, 24 तारखेला जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते. यादरम्यान, उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात हलक्या पावसाची शक्यता आहे.

किमान तापमानात विशेष बदल होणार नाही : हवामान विभाग 

IMD च्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही. तसेच, पुढील तीन दिवसांत पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही काळ कोणताही बदल होणार नाही.

जानेवारीच्या सुरुवातीला राजधानी दिल्लीला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. दिल्लीत अनेक दशकांचे रेकॉर्ड अचानक मोडू लागले. संपूर्ण उत्तर भारत धुक्याच्या गर्तेत होता. मात्र, आता गोठवणाऱ्या थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Weather Update : ऐन थंडीत पाऊस; हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा अंदाज, कुठे अन् कधी कोसळणार पाऊस?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here