मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज जयंती आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ‘स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांना मोदींच्या समोरच भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची खरी जागा कशी दाखवली याचे चित्रीकरण समोर आले. भाजपने एक पेंढा भरलेला कोल्हा खुर्चीवर बसवला आहे व त्या कोल्ह्यास काडीमात्र किंमत नाही. शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याने व्यासपीठावर जो अपमान सहन केला, अशांना बाळासाहेबांचे कटआऊट वगैरे लावून ढोंगबाजीचे प्रदर्शन करण्याची गरज नाही. त्यांचे बिंगच उघडे पडले. लाचारी व गुलामीची हद्द पार करीत त्यांनी भाजपच्या व्यासपीठावरूनच जाहीर केले, होय, होय, आम्ही मोदींची म्हणजे मोदींची माणसं आहोत? इतके सर्व स्पष्ट झाल्यावर लोकांना कळलेच असेल की, शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप व त्यांच्या हस्तकांनी रचले होते,’ असा हल्लाबोल ‘सामना’तून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपवर टीका करताना सामनातून शिवसैनिकांसाठी एक आदेशही देण्यात आला आहे. तसंच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘मंबाजी’ असा करण्यात आला आहे. ‘शिवसेनाप्रमुखांच्या आजच्या जन्मदिनी एक निर्धार प्रत्येकाने केलाच पाहिजे, तो म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या नावे सुरू झालेला ढोंगाचा बाजार कायमचा गाडण्याचा व संपवण्याचा. शिवसेनेच्या नावावर उतलेले – मातलेले मंबाजी , त्या मंबाजी मंडळाचे ‘ खोके ‘ राजकारण, त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी , त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल. मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते . त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच! अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरामखोरांची राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली,’ असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

शिवसेना-‘वंचित’ युतीची अधिकृत घोषणा होण्याचे संकेत; उद्धव ठाकरे आज भाष्य करणार

मोदी-शहांच्या कृतीचे आश्चर्य

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवर टीका करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मुखपत्र ‘सामना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधण्यात आला आहे. ‘सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते,’ अशा शब्दांत ‘सामना’तून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘विधानसभेत बाळासाहेबांचे तैलचित्र लावणे हे एक ढोंग आहे. त्या तैलचित्रात निष्ठेचा आत्मा व तेज नसल्याने चाळीस बेइमानांच्या ढोंगाशिवाय त्या सोहळय़ात दुसरे काहीच दिसत नाही. मोदींची माणसे म्हणून ज्यांची छाती आज गर्वाने फुगली आहे, त्या फुग्यास टाचणी लावून हवा कमी करण्याचे काम महाराष्ट्राची जनता नक्कीच करणार आहे,’ असा आशावादही ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here