जमिनींवर केंद्र सरकारचा दावा; मालकांची न्यायालयात धाव

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील मिठागरांच्या ६०० पैकी ३०० एकर जमिनींवर विकासकामे शक्य असल्याचा अहवाल एमएमआरडीएने राज्य सरकारला सादर केला असला तरी या जमिनींवर केंद्र सरकार मालकीचा दावा करत असताना तेथे राज्य सरकार विकासकामे करू शकते का, याविषयी साशंकता आहे. जमिनींच्या मालकीबाबत काही मिठागरे मालकांनी केंद्र सरकारविरोधात यापूर्वीच न्यायालयात धाव घेतली आहे. शिवाय, या जमिनीचे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्व, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पर्यावरणाकडे असलेला ओढा पाहता वाजवी दरातील घरबांधणीची तत्कालीन फडणवीस सरकारची योजना विद्यमान सरकार राबवेल का, हाही कळीचा मुद्दा आहे.

मुंबईतीलच नव्हे, तर देशभरातील ६० हजार एकर मिठागरांवर केंद्र सरकारने यापूर्वीच मालकी सांगितली आहे. या जमिनी संबंधितांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने देण्यात आल्या होत्या. सन २०१४मध्ये भाडेपट्ट्याचा करार संपला. त्यानंतर मीठ आयुक्तालयाने जमिनी ताब्यात घेण्यासाठी संबंधित उत्पादकांना नोटिसाही धाडल्या आहेत. या जागेवर वाजवी दरातील घरबांधणीचा तत्कालीन फडणवीस सरकारचा इरादा होता. त्यादृष्टीने सन २०१६ मध्येही सरकारने एमएमआरडीएला सर्वेक्षण करण्यास सांगितले होते. ‘२५ टक्के जागा विकासकामांसाठी उपलब्ध होऊ शकते’, असा अहवाल एमएमआरडीएने दिला होता. त्यानंतर अलीकडे पुन्हा सर्वेक्षण करून सुधारित अहवाल देण्यात आला आहे. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्याने तत्कालीन सरकारच्या जवळपास सर्वच निर्णयांचा फेरआढावा सध्याचे सरकार घेत आहे. मिठागरांच्या जागा या पर्यावरण तसेच पूरस्थिती रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने त्या घरबांधणीसाठी देण्यास पर्यावरणवादी संघटना, पर्यावरणप्रेमींचा आक्षेप आहे. आरेबाबत उद्धव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका पाहता त्यांचे सरकार मिठागरांच्या जागेवर घरबांधणीला मान्यता देईल का, असा प्रश्न आहे.

यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here