Nagpur Police Bhavan Fire News : नागपुरातील पोलीस भवनातील तिसऱ्या माळ्यावर सोमवारी दुपारी अचानक आग लागली. तिसऱ्या माळ्यावरील अकाऊंट विभागात आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि काही फाईली जळाल्याची माहिती आहे. मात्र नेमकी कोणती कागदपत्रे जळाली आहे, या बाबत अद्याप माहिती देण्यात आली नाही.

दीड वर्षांपूर्वी या इमारतीचे लोकार्पण झाले होते. त्यामुळे येथील अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती. आग लागल्यानंतर काही वेळातच ही आग इतर विभागात न पसरता अटोक्यात आली. सुदैवाने या आगीत कोणताही कर्मचारी जखमी झालेला नाही. मात्र लेखा विभागात लागलेल्या आगीमध्ये मोठ्या संख्येने कागदपत्रे आणि फाइल्सचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शिवाय लेखाशाखेत काही प्रमाणात रोख रक्कमही ठेवली होती. या आगीत काही रोख रक्कमेचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत स्पष्ट माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास तिसऱ्या माळ्यावर असलेल्या लेखाशाखेत अचानक आग लागली होती. आतमध्ये बसलेले कार्यालयीन कर्मचारी लगेच धावत बाहेर निघाले. या आगीची तातडीने अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. यात कार्यालयातील अग्निशमन यंत्रणेचीही मदत अग्निशमन विभागाला मिळाली. आगीचे कारण अजून स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

दीड वर्षांपूर्वीच नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरात अत्याधुनिक पोलीस भवनची निर्मिती झाली होती. सहा मजली प्रशस्त इमारतीमध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वी पावसाळ्यात या इमारतीतील ‘फॉल्स सीलिंग’ तीव्र वाऱ्यामुळे खाली कोसळल्याची घटना घडली होती. तर आता इमारतीतील लेखाशाखेत आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान आज आग लागताच इमारतीतील स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा वेळीच कार्यान्वित झाल्यामुळे आग लेखाविभागाच्यापलीकडे शेजारील विभागात पसरू शकली नाही.

news reels New Reels

किती नुकसान झाली याची प्रतिक्षा?

लागलेल्या आगीत कोणती कागदपत्रे जळाली, त्या फाईलींचा संबंध कुठल्या गोष्टीसोबत होता, तसेच विभागात ठेवलेली रोख रक्कमही जळाली असल्याची चर्चा होती. त्यामुळे ती किती रक्कम आगीत खाक झाली. याबद्दल विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडून या आगीबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली नाही.

ही बातमी देखील वाचा…

Nagpur News : शहरात अस्वच्छता पसरविणाऱ्यांकडून 4 महिन्यांत साडेबारा लाखांवर दंड वसूल ; तीन हजार विक्रेत्यांवर कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here