अमरावती : मध्यप्रदेशातून देशी कट्टे घेऊन अमरावतीकडे येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सिनेस्टाईल पाठलाग करून परतवाडा येथून अटक केली. त्यांच्याकडून दोन देशी कट्टे व आठ जीवंत काडतूस जप्त करण्यात आली आहेत. यापूर्वीसुद्धा २१ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने परतवाडा येथून दोन देशी कट्टे व दोन जीवंत काडतूस जप्त केली होती. पण पुन्हा असाच प्रकार समोर आल्याने आता नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल यासीर अब्दुल कलीम (२५) व अब्दुल आवेज अब्दुल कदीर (२२) दोघेही रा. पठाण चौक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक परतवाडा धारणी मार्गावर गस्तीवर होते. यावेळी पथकाला वन विभागाच्या बिहाली नाक्याजवळ धारणीकडून येत असलेल्या दुचाकीस्वार दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे पथकाने या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना बघून दुचाकीस्वार दोघेही भरधाव वेगाने पुढे निघून गेले. त्यामुळे पथकाने त्यांचा पाठलाग केला. परतवाड्यातील एका ढाब्याजवळ या दोघांना पकडण्यात आले. पथकाने दोघांचीही झडती घेतली. यावेळी त्यांच्याजवळ दोन देशी कट्टे व आठ जीवंत काडतूस आढळून आले.

ठाण्यात उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली बाईक, हवेत उडून दोन तरुण खाली कोसळले; जागीच मृत्यू
या दोघांनी आपली नावे अब्दुल यासी आणि अब्दुल आवेज असल्याचे पथकाला सांगितले. पथकाने या दोघांना अटक करून त्यांच्याकडून देशी कट्टे, काडतूसं मोबाईल व दुचाकी असा एकूण १ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अन्य एका आरोपीच्या सांगण्यावरून त्याच्यासाठीच मध्यप्रदेशातून देशी काडतूसं घेऊन आपण अमरावतीला येत होतो, अशी कबुली अब्दुल यासीर व अब्दुल आवेज यांनी पथकाला दिली. सदर फरार आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचा कसून शोध सुरू आहे.

तर या घटनेची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्व धोंडगे, दीपक उईके, युवराज मानमोठे स्वप्निल तंवर, रवींद्र वऱ्हाडे, सागर नाठे कमलेश पाचपोर यांनी केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

Weather Alert : मुंबईकरांसाठी हवामान खात्याचा इशारा, पुणे-नाशिकपेक्षाही गारठणार; वाचा वेदर रिपोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here