मुलानं कुटुंबातील विवाहित तरुणी पळवून आणल्याच्या रागाचतून वडिलांसह कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं. पती, पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह ३ मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगावमध्ये ही घटना घडली. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुटुंबानं पारगावमध्ये भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या ३ लहान मुलांचे मृतदेह भीमा नदीत सापडले. ही घटना उघडकीस आल्यानंतर घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता. पोलीस चौकशीनंतर हा प्रकार सामूहिक आत्महत्येचा असल्याचं समोर आलं आहे.
१७ जानेवारीच्या रात्री ७ जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहन उत्तम पवार, संगीता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी चार मृत व्यक्तींची नावं आहेत. शाम आणि राणी फुलवरे यांची तीन मुले गायब होती. त्यांचे मृतदेहदेखील आज भीमा नदीत सापडले आहेत. मंगळवारी १७ जानेवारी रोजी रात्री अकरानंतर वाहनाने निघोज गावातून निघाले होते. शिरूर-चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील ७ जणांनी उडी घेतली. १८ जानेवारीला कुटुंबातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर २०, २१ आणि २२ जानेवारीला एक-एक मृतदेह आणि आज तीन मुलांचे आढळून आले.