मुलाला घरी सोड, अन्यथा अब्रू जाईल; वडील संतापले
पारनेरच्या निघोजमध्ये गेल्या वर्षभरापासून वास्तव्यास असलेले, मजुरी करून पोट भरणारे मोहन पवार यांच्यासह सात जणांचे मृतदेह भीमा नदीपात्रात सापडले. मोहन उत्तम पवार (४५), संगीता मोहन पवार (४०), राणी फलवरे (२४), शाम फलवरे (२८), रितेश फलवरे (७), छोटू फलवरे (५) आणि कृष्णा फलवरे (३) अशी मृतांची नावं आहेत. सामूहिक आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात असताना पळवून आणलेल्या विवाहितेची गोष्ट समोर आली.
मोहन पवार यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी अमोल हा त्यांच्याजवळ राहतो, तर राहुल हा पुण्यात वास्तव्याला आहे. अमोलनं दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यातीलच एक विवाहित मुलगी पळवून आणली. या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले होते. त्या मुलीला तिच्या घरी सोडून ये, अन्यथा समाजात आपली अब्रू जाईल, असं मोहन यांनी अमोलला फोन करून सांगितलं. मात्र अमोल ऐकला नाही. त्यानंतर मोहन यांनी राहुलला फोन केला. आपण कुटुंबासह आत्महत्या करत असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर राहुलनं त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो स्विच्ड ऑफ होता. यानंतर कुटुंबातील सदस्यांचे मृतदेहच हाती लागले.
सामूहिक आत्महत्या नव्हे, सामूहिक हत्याकांड
पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. पवार कुटुंबाचा मृत्यू बुडून झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली. अधिक खोलात जाऊन तपास सुरू केला. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. त्यातून ही सामूहिक आत्महत्या नसून सामूहिक हत्याकांड असल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणात पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय ३९), श्याम कल्याण पवार (वय ३५), शंकर कल्याण पवार (वय ३७), प्रकाश कल्याण पवार (वय २४) आणि कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५) अशा पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी हे मृतक मोहन पवार यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत.
मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्याकांड
मोहन पवार यांच्या मुलासोबत आरोपीचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी लोणीकंद येथे गेला असताना त्याचा अपघात झाला होता. या घटनेत मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र पवार कुटुंबानं ही बाब चार दिवस मुलाच्या पालकांना सांगितली नव्हती. या घटनेत दुर्दैवानं मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा खून पवार कुटुंबीयांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता. या रागातून त्यांनी बदला घेण्याचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.