Aurangabad News: अहमदनगर (Ahmednagar) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) लाच मागणाऱ्या औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील (Aurangabad Rural Police Force) एका कॉन्स्टेबलवर कारवाई केली आहे. देशी दारूच्या दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयामार्फत पुढे पाठवायचा नसेल तर पन्नास हजार रुपये देण्याची मागणी या पोलीस कॉन्स्टेबलने केली होती. तर तडजोड अंती तीस हजारांच्या लाचेची मागणी करुन सदर रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर सिताराम काळे (वय 35 वर्ष, चालक पोलीस कॉन्स्टेबल) असे आरोपीचे नाव असून, ते वैजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत होते. 

‘एसीबी’कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गंगापूरच्या रघुनाथनगर येथे राहणारे 52 वर्षीय तक्रारदार यांच्या भावांच्या नावे गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे अधिकृत परवाना असलेले देशी दारूचे दुकान आहे. मात्र दुकानाचे सर्व कामकाज तक्रारदार हे पाहतात. दरम्यान 18 डिसेंबर 2022 रोजी पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर सिताराम काळे यांनी तक्रारदार यांची टाटा सुमो गाडी देशी दारूचे 12 बॉक्स घेऊन जात असताना विरगांव पोलीस स्टेशन हद्दीत पकडली होती. त्यामुळे गाडीमधील दारुचे बॉक्स व गाडी जप्त करुन गाडीमध्ये हजर असलेले दोन इसम व दुकानाचे मालक या नात्याने वरील तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 

50 हजारांची लाच देण्याची मागणी

या कारवाईनंतर कॉन्स्टेबल काळे यांनी तक्रारदार यांना फोन करुन वैजापूर येथे बोलावून घेतले. तसेच तक्रारदार यांना तुमच्याविरुद्ध बेकायदेशीर रित्या देशी दारू वाहतूक करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत पुढे पाठवायचा नसेल तर, 50 हजारांची लाच देण्याची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 

पंचासमक्ष लाचेची मागणी

दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत पुढे पाठवायचा नसेल कॉन्स्टेबल काळे यांनी 50 हजारांची लाच देण्याची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाल्याने एसीबीच्या पथकाने 12 जानेवारी रोजी वैजापूर येथे पंचासमक्ष लाच मागणी केल्याची पडताळणी केली. ज्यात तडजोडअंती 30 हजारांच्या लाचेची मागणी करुन सदर रक्कम स्विकारण्याची तयारी कॉन्स्टेबल काळे यांनी दर्शविली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन वैजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपासाच्या अनुषंगाने सदर गुन्हा औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. 

news reels New Reels

यांनी केली कारवाई! 

सापळा अधिकारी हरीष खेडकर (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि अहमदनगर), सहायक सापळा अधिकारी शरद गोर्डे, (पो.नि.ला.प्र.वि.अहमदनगर) सापळा पथक पोना. रमेश चौधरी, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड, चालक हारून शेख 

इतर महत्वाच्या बातम्या: 

व्हिडिओ: अगोदर देवाला नमस्कार, मग फुल वाहुन दानपेटीतील पैसे लंपास; औरंगाबादेतील घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here