म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन केवळ सहा दिवस उलटले असतानाच, महाविकास आघाडीत मंत्रिपदांवरून धुसफूस सुरू झाली आहे. आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे राज्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचे पत्र शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्याकडे पाठवून खळबळ उडवून दिली. आज, रविवारी सत्तार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून, आघाडीतील हे ‘सत्तारनाट्य’ संपणार की चालूच राहणार ते या भेटीनंतर स्पष्ट होईल.

‘माझा कंट्रोल मातोश्रीवर’

दिवसभराच्या नाट्यानंतर सायंकाळी सत्तार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘मी राजीनामा दिलेला नाही. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मी त्यांच्याकडे सर्व माहिती देईन. ते जो निर्णय घेतील तो मान्य राहील. वेळ आल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. मी राजीनामा दिला की नाही हे माझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडणाऱ्यांनाच जाऊन विचारा. माझा सर्व कंट्रोल मातोश्रीवर आहे’, असे सत्तार म्हणाले.

सत्तार आज ‘मातोश्री’वर

खातेवाटपाचा घोळ सुरू असतानाच शनिवारी सकाळी शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याचे वृत्त पसरले. सत्तार यांनी औरंगाबाद येथील अतिथी हॉटेलमध्ये कोंडून घेतल्याने तर या वृत्ताला दुजोराच मिळत होता. शिवसेना नेत्यांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, सत्तार यांनी त्यांचे फोन घेतले नाहीत. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. शेवटी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर सत्तार यांची समजूत काढण्याची जबाबदारी देण्यात आली. खोतकर यांनी अतिथी हॉटेलमध्ये दोनवेळा सत्तार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर, ‘सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, त्यांची नाराजी दूर झालेली आहे. रविवारी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत’, अशी माहिती खोतकर यांनी दिली.

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, शिवसेनेचे भास्कर जाधव, ललित बाबर, माजी मंत्री दीपक केसरकर यांच्यासह काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनीही मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

कैलाश गोरंटयाल यांचीही धमकी

सत्तार यांच्यापाठोपाठ जालनाचे काँग्रेसचे आमदार कैलाश गोरंटयाल यांनीही मंत्रिपद न मिळाल्याने आमदारकीचा राजीनामा देत असल्याची धमकी दिली आहे. ते तिसऱ्यांदा आमदार झाले असून, सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा त्यांनी पराभव केला आहे. जालना नगर परिषदही त्यांनी काँग्रेसच्या ताब्यात ठेवली आहे. परंतु, ‘पक्षाने मंत्रिपदासाठी आपली दखल घेतली नाही. त्याच त्याच घराण्यांना पुन्हा मंत्रिपदे मिळणार असतील तर आम्हाला संधी केव्हा मिळणार?’, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण पुढील निर्णय घेऊ’, असे त्यांनी स्पष्ट केले.



Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here