मोहन पवार, त्यांच्या पत्नी संगीता पवार, मुलगी राणी, जावई शाम आणि त्यांच्या ३ मुलांचे मृतदेह नदीत सापडले होते. १७ जानेवारीला हे कुटुंब नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधून दौंड तालुक्यातील पारगावला पोहोचले. त्यानंतर त्यांनी भीमा नदीपात्रात उडी घेत सामूहिक आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते.
शवविच्छेदन अहवालातून सर्वांचा मृत्यू बुडून झाला असल्याचे समोर आले होते. परंतु नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला होता. त्यावर पोलिसांनी तपास केला असता, मोहन पवार यांच्या चुलत भावांनी पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना नदीत फेकून दिलाचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. त्यावरून पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंद करून अटक केली आहे.
मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्याकांड
मोहन पवार यांच्या मुलासोबत आरोपीचा एक मुलगा दुचाकीवर काही दिवसांपूर्वी लोणीकंद येथे गेला असताना त्याचा अपघात झाला होता. या घटनेत मुलगा गंभीर जखमी होऊन त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र पवार कुटुंबाने ही बाब चार दिवस मुलाच्या पालकांना सांगितली नव्हती. या घटनेत दुर्दैवाने मुलाचा मृत्यू झाला. आपल्या मुलाचा खून पवार कुटुंबीयांनी केल्याचा संशय चुलत भावांना होता. या रागातून त्यांनी बदला घेण्याचा कट रचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणात पोलिसांनी अशोक कल्याण पवार (वय ३९), श्याम कल्याण पवार (वय ३५), शंकर कल्याण पवार (वय ३७), प्रकाश कल्याण पवार (वय २४) आणि कांताबाई सर्जेराव जाधव (वय ४५) अशा पाच जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी हे मृतक मोहन पवार यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत.