चंद्रपूर : पोहायला गेलेली तीन मुलं बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून या घटनेनं परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक परिसरातील ही घटना आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर पोलिसांना मुलांचे कपडे व इतर साहित्य आढळले आहे. रात्र उशिरापर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र अद्याप मुलांचा शोध लागू शकला नाही. अंधार झाल्याने बचाव पथकाला अडचण येत होती. त्यामुळे रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली. याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, कोरपना तालुक्यात येणाऱ्या अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील शाळेत शिकणारी अंदाजे १० वर्षांची तीन मुले पोहायला गेल्यानंतर सायंकाळपर्यंत घरी परतली नाहीत. शोधाशोध केली असता गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अल्ट्राटेक कंपनीने तयार केलेल्या डबक्याजवळ मुलांची कपडे आढळून आली. मात्र मुले कुठेही दिसली नाहीत. त्यामुळं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तीनही मुले डबक्याच्या पाण्यात पोहण्यासाठी गेली असावीत आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडाली असावीत, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कंपनी व्यवस्थापन व गडचांदूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत मुलांचा शोध घेतला. मात्र ती कुठेही आढळून आली नाहीत.दरम्यान, आज पहाटेपासूनच शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. बेपत्ता असलेली तिन्ही मुलं अंदाजे १० वर्ष वयोगटातील असून एकाच वर्गात शिकत असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here