Maharashtra Politics in Nashik | गेल्या अनेक वर्षांपासून तांबे घराणे हे काँग्रेसचे सच्चे पाईक मानले जाते. परंतु, आता सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरुन काँग्रेस पक्षाशी नाते सांगणारी आपली ओळख हटवली होती. त्यामुळे सत्यजीत तांबे काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. ते भाजपमध्ये जातील, असा अंदाज काहीजणांकडून व्यक्त केला जात आहे.

 

Sujay Vikhe Patil & Devendra Fadnavis
सुजय विखे पाटील आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार
  • नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक
  • ३० जानेवारीला मतदान
नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचे केंद्र ठरत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात येत्या काही दिवसांमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे नाशिक पदवीधरमध्ये भाजप शेवटच्या क्षणाला एखादा नवा डाव खेळणार का, याची चर्चा रंगली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे चित्र एका रात्रीत बदलण्याची क्षमता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे त्यांनी म्हटले. ते गुरुवारी नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने चुरस निर्माण झाली होती. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तांबे यांनी भाजपसह सर्वपक्षीयांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. परंतु, अद्याप भाजपने अधिकृतरित्या सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी ताकद उभी केलेली नाही. येत्या ३० जानेवारीला नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे भाजप शेवटच्या क्षणी आपले पत्ते उघड करुन सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी ताकद उभी करेल, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे-पाटील यांचे वक्तव्य सूचक मानले जात आहे. भाजप नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार, असा प्रश्न सुजय विखे यांना विचारण्यात आला. त्यावर सुजय यांनी म्हटले की, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे योग्यवेळी पक्षाचा निर्णय देतील. निवडणूक जवळ आली असली तरी एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. ज्या माणसाचं नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून येईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि रात्रीतून चित्र बदलून टाकू. याची अनुभूती सगळ्या जिल्ह्याला येईल, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून सत्यजीतसाठी पक्ष तयार होता? कोरा एबी फॉर्म दिल्याची चव्हाणांची माहिती
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तांबे पितापुत्रांनी शेवटच्या क्षणी काँग्रेस पक्षाला धक्का दिल्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शुभांगी पाटील विरुद्ध सत्यजीत तांबे अशी दुरंगी लढत रंगणार आहे.
केंद्रीय तपासयंत्रणा हातात असल्या की देवेंद्र फडणवीसांसारखे चाणक्य पायलीला पन्नास निर्माण होतात: सामना

सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा?

सत्यजीत तांबे यांना भाजपने अधिकृतरित्या पाठिंबा दिला नसला तरी पडद्यामागे गुप्तपणे बऱ्याच घडामोडी सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप नेते गिरीश महाजन नाशिकमध्ये ठाण मांडून होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी गिरीश महाजन यांनी काही उमेदवारांना माघार घेण्यास राजी केले. तर दुसरीकडे भाजपचे दिग्गज नेते व माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या संस्थेत मात्र सत्यजीत तांबे यांचा प्रचार मेळावा दणक्यात पार पडला होता. भाजपचे नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे हे स्वत: व त्यांच्या संस्थेचे कर्मचारीही मेळाव्यात सक्रीय सहभागी झाले होते. त्यामुळे भाजप पडद्यामागे राहून या निवडणुकीत सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी ताकद उभी करत असल्याची चर्चा आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here