India Today-C Voter ने केलेल्या ‘मूड ऑफ नेशन’ या सर्वेक्षणात देशातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेण्यात आला आहे. यामध्ये देश ते राज्य पातळीवरील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये देशातील टॉप १० मुख्यमंत्री कोण, यासाठी जनतेकडून कौल घेण्यात आला. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आठव्या क्रमांकावर आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ३९ टक्के लोकांनी पसंती दिली असून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. परंतु, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून केवळ २.२ टक्केच लोकांनी पसंती दिली आहे.
कोरोना साथीच्या काळात ‘मूड ऑफ नेशन’कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या टॉप १० मुख्यमंत्र्यांची यादी कायमच चर्चेचा विषय असायची. या काळात उद्धव ठाकरे हे सातत्याने लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत वरचा क्रमांक पटकावताना दिसत होते. परंतु, ‘मूड ऑफ नेशन’च्या यावेळच्या टॉप १० मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे यांचा आठवा क्रमांक आहे. भाजपने अनेक राजकीय गणितांचा विचार करुन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवले होते. परंतु, टॉप १० मुख्यंत्र्यांच्या यादीत एकनाथ शिंदे हे जवळपास तळाला आहेत. त्यामुळे लोकप्रियतेच्या बाबतीत एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा फिके पडत आहेत का, असा सवाल निर्माण झाला आहे.
राज्यात आज निवडणुका झाल्यास भाजपला धक्का, महाविकास आघाडीची सरशी
राज्यात आता लोकसभेची निवडणूक झाल्यास युपीएला ३४ जागांवर विजय मिळेल असे India Today-C Voter ने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत यूपीएला ६ जागांवर विजय मिळवला होता. परंतु, २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडी अस्तित्त्वात आली. याच आघाडीला आजघडीला निवडणुका झाल्यास लोकसभेच्या ३४ जागांवर विजय मिळेल. याचा अर्थ शिंदे-फडणवीस आघाडीला फक्त १४ जागा मिळतील. ‘