कोल्हापूर: तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे आपला भारतीय राष्ट्र पक्ष हा पक्ष महाराष्ट्रात लाँच करत आहेत. यासाठी ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी नांदेड येथे मोठा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यात अनेक नेते व संघटनांचे त्यांच्या पक्षाला समर्थन मिळणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी रविवारी के सी आर यांची त्यांच्या हैदराबाद येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, के सी आर यांनी संभाजीराजे छत्रपती यांना स्नेहभोजनासाठी विशेष निमंत्रित केले होते. यावेळी त्यांच्यामध्ये तब्बल पाच तास चर्चा झाली.

छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून राज्यात नवा राजकीय पर्याय उभा करीत आहेत. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी हा निर्णय घेतला होता. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आगामी काळात निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याचे संकेत त्यांनी दिले होते. मध्यंतरीच्या काळात संभाजीराजे यांच्याकडून मोर्चेबांधणी करण्यासाठी काही भेटीगाठी घेतल्या होत्या. परंतु, याशिवाय स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून एखादी ठोस राजकीय कृती झाली नव्हती. मात्र, आता ते तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने ही नव्या राजकीय समीकरणाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. के सी आर हेदेखील महाराष्ट्राच्या राजकीय रिंगणात येऊ पाहत आहेत. के सी आर यांचा चेहरा महाराष्ट्रात नवा असून इथे आपले पाय रोवण्यासाठी त्यांना राज्यातील सर्वपरिचित, प्रभावी व स्वच्छ चेहरा आवश्यक आहे. यासाठी ते संभाजीराजे यांच्याकडे सर्वोत्तम पर्याय म्हणून पाहत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच के सी आर यांचा पक्ष छत्रपतींच्या स्वराज्य संघटनेशी युती करून देखील राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो. असे झाल्यास राज्याचा राजकारणात एके नवे समीकरण जुळवले जाऊ शकते. यामुळे प्रस्थापित सर्वच पक्षांना चांगलाच हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धर्मवीर की स्वराज्यरक्षक? अजित पवारांच्या वक्तव्यावर संभाजीराजेंची रोखठोक भूमिका, म्हणाले…

संभाजीराजे छत्रपती भेटीविषयी काय म्हणाले?

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री के. चंद्रशेखर राव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन व विविध विषयांवर प्रदीर्घ चर्चा झाली. श्री राव यांनी केवळ निवडणुकीपुरती आश्वासने न देता अथवा केवळ राजकीय दृष्टिकोन ठेवून कार्य न करता जनहित व राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून व्यापक कार्य आपल्या राज्यात केले आहे. श्री राव यांनी गेल्या १४ वर्षांत तेलंगणा राज्यात विकासाची गंगा आणली आहे. त्यांचे कृषीधोरण, जनधोरण, सिंचन योजना, गरीब व वंचितांसाठी आखलेल्या विविध योजना व शिक्षण पद्धती या संपूर्ण देशासाठी मार्गदर्शन व आदर्शवत आहेत.

त्यांच्या या योजना व कार्यपद्धती याविषयी प्रदीर्घ चर्चा झाली. श्री राव हे केवळ आपल्या राज्यापुरते मर्यादित न राहता इतर राज्यांच्या विकासाचा व त्यामाध्यमातून संपूर्ण राष्ट्राचा विकास साधण्याचा दूरगामी दृष्टिकोन ठेवणारे अत्यंत ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या निवासस्थानी अगदी आपुलकीने आदरातिथ्य केले. छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांना पूर्ण अभ्यास असून महाराजांविषयी त्यांच्या मनात अत्यंत आदरभाव जाणवला. यावेळी श्री राव यांना राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा चरित्रग्रंथ भेट दिला, असे संभाजीराजेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here