एका आठवड्यात जड वाहनाच्या खाली आल्याने दोन मुलांचा मृत्यू
सोलापुरात अवजड वाहनांमुळे जाणाऱ्या बळींचे प्रमाण वाढले आहेत. २२ जानेवारीला संध्याकाळी जुना पुना नाका येथे डंपर खाली चिरडून श्रीपाद पवन कवडे या १० वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आज दुपारी दीडच्या सुमारास अल्ताफ बागवान (वय 3 वर्ष) या लहान मुलाला ट्रकने चिरडले आहे. दोन्ही अपघातात लहान मुलांच्या डोक्यावरून मागचे चाक गेले.
वृद्ध दाम्पत्य लहान मुलासोबत दुचाकीवरून जात असताना, अशोक चौक येथे तानाबाना दुकानासमोर अपघात झाला. मागून आलेल्या ट्रकने दुचाकीला उडवले. आजोबा बाजूला पडले. आजी व नातू ट्रकच्या मागील चाकात अडकले. आजीच्या हातावरून चाक गेले, तर तीन वर्षीय अल्ताफच्या डोक्यावरून ट्रकचा चाक गेल्याने चेंदामेंदा झाला आहे.
कार्यक्रमाला जाताना अपघात
सरदार बागवान व मुमताज बागवान हे कर्जाळ येथून सोलापूर शहरातील काजल नगर येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जात होते. नातू अल्ताफ बागवान हट्ट धरून आजी आजोबांसोबत निघाला होता. कर्जाळ येथून सोलापूर शहरापर्यंत सुखरूप आले. शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य चौकात प्रवेश करून अशोक चौक मार्गे सरदार व मुमताज हे वृद्ध दाम्पत्य जात होते. अशोक चौक ते गुरुनानक चौक दरम्यान मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवत असताना दुचाकीचा तोल जात होता. त्याचवेळी वळण घेताना मागून ट्रक आला आणि आजीआजोबांसह नातवाला फरफटत घेऊन गेला.
मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची आक्रमक भूमिका
प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शहरात अवजड वाहने सोडणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांवर, रस्त्याची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्यावरच मृतदेह ताब्यात घेतले जाणार असल्याची भूमिका घेतली आहे. मृत अल्ताफच्या नातेवाईकांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी माहिती दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच मृत बालकाचे आई वडील आणि इतर नातेवाईक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले. चेंदामेंदा झालेले अल्ताफचे शरीर पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला. नातेवाईकांमधील महिलांच्या किंकाळ्यांमुळे रुग्णालय परिसर सुन्न झाला.