मुंबई : ऑनलाईन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या जाहिरातींतील हिंदी आणि मराठी क्षेत्रातील चित्रपट कलाकारांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी परिपत्रक काढत अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, अमेय वाघ यासारख्या कलाकारांची नावंही देण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात मटका किंवा पत्ते खेळण्यावर बंदी आहे. एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचे खेळ खेळताना कोणी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र ऑनलाईन रमीमधून सर्रास महाराष्ट्रात अवैध धंदा सुरु आहे. या धंद्याला आणखी यशस्वी करण्यात मराठी चित्रपट कलाकार जाहिरात करुन लोकांना रमी खेळण्यास प्रवृत्त करत आहेत, असंही राष्ट्रवादीने म्हटलं आहे. मराठी कलाकारांनी आपल्या परिवारातील आई, वडील, भाऊ, बहीण अशा लोकांना रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं असतं का? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.

अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, श्रुती मराठे, उमेश कामत, संतोष जुवेकर, गौरी नलवडे आणि अमृता खानविलकर यासारखे आघाडीचे मराठी कलाकार यामध्ये असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

तसेच, हिंदीतील अभिनेते हृतिक रोशन, अन्नू कपूर, कुमार सानू, शक्ती कपूर, आलोक नाथ, रजा मुराद, अनुप सोनी, मनोज वाजपेयी, अली असगर, शिशिर शर्मा यांचा समावेश असल्याचंही पत्रकात नमूद आहे.

काही नामांकित मराठी आणि हिंदी कलाकारांनी समाजावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून दारू, गुटखा आणि अशा प्रकारच्या कुठल्याही जाहिराती नाकारल्या आहेत, ज्याने समाजाचं स्वास्थ खराब होईल. अशा कलाकारांचं सुद्धा कौतुक आम्ही करतोच. मात्र जे कलाकार फक्त पैसे कमवण्याच्या उद्देशाने समाजस्वास्थ्य बिघडवत असतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन शिक्षा होणंही महत्त्वाचं आहे, असं या पत्रामध्ये बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : ठाकरेंसोबत नव्याने संसार थाटलेले आंबेडकर म्हणतात, तर मी भाजपसोबत युती करण्यास तयार…!

Online Rummy.

हेही वाचा : अमृता फडणवीसांवर भाजपच्याच ताकदवान नेत्याची आक्षेपार्ह टिप्पणी, पोलिसांची मोठी कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here