चंद्रपूर : प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे निघालेली खासगी बस विरुर- धानोरा मार्गावर पलटली आहे. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. अपघातातील जखमींना विरुर, राजुरा, चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. यातील काही प्रवाशांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या विरूर- धानोरा मार्गावरून खासगी बस प्रवाशांना घेऊन निघाली होती. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस रस्त्यात पलटली. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ ते १८ प्रवासी जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.

घटनेची माहिती मिळताच विरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना बसमधून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. काही जखमींना राजुरा तर काहींना चंद्रपुरातील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अतिगंभीर असलेल्यांना प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात पाठवल्याची माहिती आहे.

दोघांनी चुगली केल्याने नोकरी गेली, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान अनर्थ घडला…

दरम्यान, बसचालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here