पाटील म्हणाले, ‘कुठलेही राजकीय समीकरण तयार झाले, तरी भाजपचाच विजय होईल, असा कसबा मतदारसंघ आहे. खासदार गिरीश बापट यांनी कसब्यात पक्षाची भक्कम बांधणी करून, हा बालेकिल्ला तयार केला आहे. पोटनिवडणुकीसाठी नेमलेल्या राजकीय समितीचे नेतृत्व माधुरी मिसाळ, संघटनात्मक समितीचे नेतृत्व राजेश पांडे, तर व्यवस्थापन समितीचे नेतृत्व प्रमोद कोंढरे करतील.’
‘निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू. माधुरी मिसाळ त्यासाठी राजकीय पक्षांशी संपर्क साधतील. परंतु, निवडणूक बिनविरोध न झाल्यास आम्ही गाफील राहणार नाही. त्यासाठीच ही तयारी सुरू असून, प्रत्येक नगरसेवकाला एका बूथची (शक्तिकेंद्र) जबाबदारी दिली जाईल,’ असेही पाटील म्हणाले.
‘सध्या महाविकास आघाडीमध्ये तिकीटावरून वाद आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हास्यास्पद नेतृत्व ठरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अशा पक्षांना लोक उभे करणार नाहीत. कसब्यात भाजपच जिंकेल,’ असे मुळीक म्हणाले. ‘यंत्र, तंत्र आणि मंत्र या त्रिसूत्रीवर आपण कसबा विधानसभा निवडणूक सहज जिंकू शकतो,’ असे मिसाळ म्हणाल्या. ‘बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा पाया असून, त्याद्वारे आपण मतदारांपर्यंत पोहोचावे,’ अशी सूचना पांडे यांनी केली. भाजपचे कसबा विधानसभा अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी प्रास्तविक केले. राजू काकडे यांनी सूत्रसंचालन केले. छगन बुलाखे यांनी आभार मानले.
काकडे यांनी टोचले कान
‘या निवडणुकीवर माझे बारीक लक्ष असणार आहे. प्रत्येकाच्या प्रभागात कोणाला किती मते मिळाली याची नोंद घेतली जाईल. कमी मते मिळणाऱ्या भागातील इच्छुकांच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारीच्या बाबत विचार केला जाईल. चमचेगिरी करून काही होणार नाही, हे लक्षात ठेवा,’ अशा शब्दांत संजय काकडे यांनी उपस्थित माजी नगरसेवकांचे कान टोचले. काकडे यांच्या वक्तव्याला उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली असली, तरी त्यांचा निशाणा नेमका कोणावर आहे, यावर चर्चा रंगली होती.
या पाच नावांची चर्चा
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश, मुलगा कुणाल यांच्याशिवाय हेमंत रासने, धीरज घाटे आणि गणेश बीडकर ही नावे चर्चेत आहेत.