रांची: झारखंडच्या धनबादमधील मध्यरात्री एकच्या सुमारास एका खासगी रुग्णालयाला आग लागली. यात ६ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयाला लागलेल्या आगीत सहा जण जिवंत जळाले. दुर्घटनेवेळी सगळे जण झोपले होते. डॉक्टरांचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी ते पाण्याच्या टबमध्ये बसले होते. तिथेच त्यांचा मृतदेह आढळून आला.

आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आग स्टोर रुममध्ये लागली आणि त्यानंतर ती रुग्णालयात पसरली. दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात डॉक्टर हाजरा खिडकीतून बाहेर डोकावून मदतीचं आवाहन करत आहेत. त्यावेळी खाली असलेले अग्निशमन दलाचे जवान त्यांच्याशी संवाद साधत आहेत. चिंता करू नका डॉक्टर साहेब, आम्ही येत आहोत. शिडीनं आम्ही तुमच्या जवळ येत आहोत, अशा शब्दांत अग्निशमन दलाच्या जवानांनी डॉक्टरांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
पत्नी खूप चांगली, माझ्यातच उणीव, तिच्या लायकीचा नाही; कुटुंबाला संपवत डॉक्टरनं जीव दिला
मध्यरात्री एकच्या आसपास हाजरा क्लिनिक आणि रुग्णालयात आग लागली. धनबादमधील टेलिफोन एक्सचेंज रोडवर हे रुग्णालय आहे. डॉक्टर कुटुंबासह क्लिनिकच्या पहिल्या मजल्यावर राहतात. दुर्घटनेत डॉक्टर दाम्पत्य (विकास हाजरा आणि प्रेमा हाजरा), त्यांची मोलकरीण, डॉक्टरांचा भाचा यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. सर्वांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सापडले.

रात्री एकच्या सुमारास आग लागल्याचं पाहिल्याचं रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकानं सांगितलं. ‘आम्ही धावत वर पळालो, त्यावेळी पहिला मजला जळत होता. इतर सुरक्षा रक्षकांच्या मदतीनं आम्ही तासाभरानंतर सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले. दुर्घटनेवेळी खालच्या मजल्यावर १० ते १५ रुग्ण होते. त्यांना आगीबद्दल समजताच ते स्वत:च बाहेर पडले. आग तळमजल्यापर्यंत पोहोचली नाही,’ अशी माहिती सुरक्षा रक्षकानं दिली.
घरातून निघाले, रेल्वे स्टेशन गाठले, प्लॅटफॉर्मवर घुटमळले; अखेर दोघांचं ठरलं अन् सगळंच संपलं
डॉक्टरांनी दोन कुत्रे पाळले होते. त्यातील एका कुत्र्याचा श्वास कोंडल्यानं मृत्यू झाला. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी दुसऱ्या कुत्र्याचा जीव वाचला. रुग्णालयात लागलेल्या आगीबद्दल आणि त्यातील जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. आग लागण्यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here