जयपूर: राजस्थानच्या जयपूरमध्ये चोरीची एक विचित्र घटना घडली आहे. एका मिठाईच्या दुकानात घुसून चोरट्यानं चोरी केली. त्यानं दुकानातील मिठाई खाल्ली आणि त्यानंतर गल्ला घेऊन फरार झाला. चोरटा दुकान मालकासाठी दोन पानांचं पत्र सोडून गेला. त्यात त्यानं स्वत:चा उल्लेख अतिथी चोर असा केला आहे. चोरी झाल्याचं लक्षात येताच दुकानदारानं घटनेची माहिती पोलिसांना दिली.

भणियाणामधील एका बाजारपेठेतील मिठाईच्या दुकानात चोरी झाली. एक चोरटा भिंत फोडून मिठाईच्या दुकानात शिरला. त्यानं दुकानातील मिठाई खाल्ली आणि गल्ला घेऊन फरार झाला. मात्र त्याआधी त्यानं दुकान मालकासाठी एक पत्र लिहिलं. ‘नमस्कार साहेब, मी एक चांगला माणूस आहे. मी तुमच्या दुकानात चोरी करण्यासाठी नव्हे, तर माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी शिरलो होतो. मी कालपासून जेवलेलो नाही. त्यामुळे उपाशी होतो. भूक लागल्यानं तुमच्या दुकानात शिरलो. तुम्ही गरीब आहेत याची कल्पना आहे. त्यामुळे दिलासा देण्यासाठी हा अर्ज लिहित आहे,’ असं चोरट्यानं पत्रात नमूद केलं.
रुग्णालयाला भीषण आग; अख्ख्या मजला पेटला; जीव वाचवण्यासाठी डॉक्टर बाथटबमध्ये बसले, पण…
‘मी तुमच्या पैशांचा गल्ला घेऊन जात आहे. मी तुमच्या दुकानात फार काही खाल्लं नाही. पांढऱ्या मिठाईचे दोन पीस खाल्ले आणि आग्र्याच्या दोन पेठा खाल्ल्या. पोलिसांना बोलवू नका. तुमचा पाहुणा,’ असं चोरट्यानं पत्राच्या शेवटी लिहिलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानदार गोमाराम मिठाईच्या दुकानात गेला. त्यावेळी त्याला मागच्या भिंतीच्या विटा तुटलेल्या दिसल्या. त्याला दुकानात दोन पानी पत्र सापडलं. याची माहिती त्यानं पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. चोराला अद्याप अटक झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here