म. टा. प्रतिनिधी, मुंबई

रूळ ओलांडणे, आत्महत्या या आणि अन्य कारणांमुळे रेल्वे रुळांवर अपघात घडतात. अनेक वेळा जखमी प्रवाशांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचे प्राण जाण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवर १५० प्रशिक्षित हमाल नियुक्त करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून फेब्रुवारीअखेर सर्व स्थानकांत हे हमाल कार्यरत होणार आहेत.

रेल्वे स्थानकांवरील अपघातातील जखमी प्रवाशांना नेण्यासाठी रेल्वे स्थानकांत कोणतीही व्यवस्था नसते. यामुळे रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना स्थानकातील गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांच्या मदतीने जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करावे लागते.

‘जखमींना उचलून रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुमारे १५० हमाल नियुक्त करण्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चर्चगेट ते डहाणू रोडपर्यंत उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रत्येकी चार हमाल नियुक्त करण्यात येतील. १२ तासांच्या शिफ्टमध्ये प्रत्येकी दोन हमाल स्थानकांवर फेब्रुवारी महिन्यांपासून उपलब्ध होतील,’ असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

रेल्वे अपघातातील जखमींना कसे हाताळायचे, अपघातग्रस्तांना स्थानकांत प्रथमोपचार कसे देण्यात यावेत याचे प्राथमिक प्रशिक्षण त्यांना देण्यात येईल. हे हमाल रेल्वे सुरक्षा बलाला आणि रेल्वे पोलिसांना मदतनीस म्हणून काम करतील, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबई रेल्वेवर रोज सुमारे आठ ते १० प्रवाशांचा अपघात होतो. प्रशिक्षित हमालांमुळे जखमींची योग्य प्रकारे हाताळणी झाल्याने त्यांचे प्राण वाचू शकतील. तसेच रेल्वेतील सुरक्षा यंत्रणांना देखील या हमालांमुळे काही अंशी दिलासा मिळेल, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here