म. टा. प्रतिनिधी, पुणेः करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी खाटांचा कमतरता असल्याने आता नर्सिंग होम आणि ५० पेक्षा कमी खाटा असलेली लहान रूग्णालये ही कोविड रुग्णालये केली जाणार आहेत. पुण्यात ७०० नर्सिंग होम आणि ५० पेक्षा कमी खाटा असलेली १०० रूग्णालये असून, या ठिकाणीही करोनाबाधित रुग्णांवर उपचार होऊ शकणार आहेत.

करोनाचे रुग्ण वाढत असल्याने खाटांची उपलब्धतेचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार आता नर्सिंग होम आणि ५० पेक्षा कमी खाटा असलेली रुग्णालये ही कोविड रुग्णालये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सौरभ राव म्हणाले, ‘सध्या ऑक्सिजनयुक्त खाटा आणि अतिदक्षता खाटांची आवश्यकता आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खाटा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्या १०० पेक्षा जास्त खाटा असलेल्या रूग्णालयांमधील ८० टक्के खाटा या करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येत आहेत. आता नर्सिंग होम आणि ५० पेक्षा कमी खाटा असलेली रुग्णालये ही करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात येत आहे’

‘ससून, नायडू आणि दळवी रूग्णालयांत खाटा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापुढे महापालिकांची विविध रुग्णालये ही करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्याबाबत विचार सुरू आहे’ असे राव यांनी स्पष्ट केले.

डॉक्टर आणि नर्स उपलब्ध होणार

‘रुग्णांची संख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्स यांची आवश्यकता भासणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जनरल प्रॅक्टिशनर संघटनेने ६०० डॉक्टर हे खासगी आणि सरकारी रूग्णालयांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. काही रूग्णालयांमध्ये रुग्ण जास्त असताना डॉक्टर हे कमी आहेत. याउलट स्थिती काही रूग्णालयांमध्ये असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्स आणि आया या उपलब्ध होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यांच्या विश्रांतीच्या दिवसांबाबत एकसूत्रता आणण्यात येणार आहे; तसेच वैद्यकीय आणि नर्सिंग कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे’ असे राव म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here