जालनाः गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत हा मुलगा लोकशाहीवर भाषण करताना दिसतोय. लोकशाही म्हणजे काय आणि त्याच्या जीवनात त्याला क्षणोक्षणी लोकशाही कामी येते हे ठामपणे सांगताना तो दिसत आहे. त्याला लोकशाही खूप आवडते. मी खूप दंगा मस्ती करतो, पण माझे बाबा मला रागवत नाही कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा सगळेच पोट धरून हसतात. या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा पठ्ठा नेमका आहे तरी कोण आणि याचे शिक्षक कोण असे प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित झाले. अखेर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने या चिमुकल्याचा शोध घेतलाच.

कार्तिक जालिंदर वजीर असं या मुलाचं नाव आहे. मुळचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवलगाव इथे पहिल्या इयत्तेत तो शिकतोय. वडील शेतकरी आहेत. घरची परिस्थितीही बिकट आहे. मुळातच खोडकर प्रवृत्तीचा कार्तिक दिसायला खूपच गोरापान असल्याने मित्र त्याला गमतीने भुऱ्या म्हणतात. पण व्रात्य, खोडकर आणि आपल्या मधुर वाणीने सगळ्यांना आपलंसं करणारा कार्तिक रातआंधळेपणाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यांची दृष्टी कमी झाल्यानं त्याला वर्गात फळ्याच्या समोरच बसावं लागतं.

VIDEO: बाबा मला मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात! चिमुकल्याचं एक नंबर भाषण; खो खो हसाल
वर्गात मागे बसलेल्या कार्तिकला फळ्यावरचं काहीच वाचता येत नाही म्हणून शिक्षक भारत म्हस्के यांनी कर्तिकची चौकशी केली. त्यावेळेस त्यांना कर्तिकच्या निष्पाप आणि हसऱ्या चेहऱ्या मागचं दुःख कळलं. तेव्हापासून त्याचे शिक्षक त्याला फळ्यासमोरच बसवू लागले. कार्तिक मुळातच हुशार आहे. पहिल्या इयत्तेत असतानाही त्याचे पाढे पाठ आहेत, खेळातही तो पुढे आहे कब्बडीच्या स्पर्धेत तो आवर्जुन भाग घेतो.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत विविध स्पर्धा होत्या. त्यावेळी भाषण करण्यासाठीही काही मुलांची निवड करण्यात आली होती. मुलं भाषण ठोकतात मग मी का बोलू नये, असा हट्टचं कार्तिकने केला होता. हट्ट्याला पेटलेल्या कार्तिकला त्याच्या सरांनी मग लोकशाहीवर बोलायला सांगितलं. त्याला भाषणही पाठ करायला दिलं. तर त्याच शाळेत शिकणाऱ्या त्याच्या बहिणीला त्याची भाषणाची तयारी करुन घ्यायला सांगितली.

लोकशाहीची मूल्य आतंकवादी तुडवतात, तसं सर मला तुडवतात; प्रजासत्ताक दिनाचं असं भाषण तुम्ही कुठेच ऐकलं नसेल !

पटांगणावर मोठ्या आत्मविश्वासाने लोकशाहीवर भाषण करत कार्तिकने एकच धुरळा उडवून दिला. कार्तिकचा व्हिडिओ संपूर्ण राज्यभरात व्हायरल झाला आणि या चिमुकल्याचे फॅन झाले. दरम्यान, आभ्यासात, खेळात हुशार आणि चुणचुणीत कार्तिकला गरज आहे हे जग बघण्याची. त्यासाठी त्याच्या रातआंधळेपणावर उपचारही व्हायला हवे असे त्याचे शिक्षक भारत म्हस्के पाटील म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here