medical student murder, शुभांगीच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची अपडेट; पोलिसांना ओढ्यात आढळली हाडे, तपासाला वेग – shubhangi jogdand murder case important update police found bones in the water
नांदेड : प्रेम प्रकरणाला विरोध करत स्वतःच्या मुलीची हत्या करून मृतदेह जाळल्याचा प्रकार नांदेडच्या पिंपरी महिपाल या गावामध्ये घडला होता. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शुभांगी जोगदंड हिची वडील, भाऊ आणि मामांनी हत्या केली. हत्येनंतर राख आणि हाडे ओढ्यात फेकून देण्यात आली होती. त्यामुळे पुरावा गोळा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. याप्रकरणी तपास करत असताना लिंबगाव पोलिसांना हिवरा परिसरातील ओढ्यात हाडे आढळली आहेत. फॉरेन्सिक टीम त्यावरून पुढील तपास करत आहे. ही हाडे शुभांगीचीच असल्याचे डी. एम. चाचणीतून स्पष्ट करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
शुभांगी जोगदंड हत्या प्रकरणात अनेक बाबींचा उलगडा होणे अद्याप बाकी आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. शुभांगीच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. प्रेम प्रकरणातून ही हत्या तिच्याच वडील आणि नातेवाईकांनी केल्याचे समोर आलं आहे. यात वडील, भाऊ आणि मामा अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. एका निनावी फोनमुळे शुभंगीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. लहानपणीच रातआंधळेपणा, परिस्थिती बिकट; लोकशाहीचा भन्नाट अर्थ सांगणारा चिमुकला आहे तरी कोण?
शुभांगी नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत होती. काही महिन्यांपूर्वी तिचा विवाह ठरला होता. गावातील युवकाशी तिचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिचा विवाह मोडला होता. समाजात बदनामी झाल्याचा राग मनात ठेवून तिची हत्या करण्यात आली. शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड (वय ४८), भाऊ कृष्णा (१९), गिरधारी (वय ३०), गोविंद (३२) आणि केशव शिवाजी कदम (३७) अशी आरोपींची नावे आहेत.
पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक कुरापती
शुभांगीचा गळा अवळण्यापूर्वी आपले हात थरथरू नयेत म्हणून सर्व आरोपींनी अगोदर दारू प्यायली होती. त्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळण्यात आला. तिची राख आणि अस्थी एका ओढ्यात टाकून देण्यात आली. ज्या ठिकाणी प्रेत जाळले त्या ठिकाणी नांगर फिरवून त्यावर पाणी सोडण्यात आले. हा सर्व प्रकार पुरावा नष्ट करण्यासाठी नराधम आरोपींनी केला. मात्र शुभांगी दोन-तीन दिवस दिसली नसल्याने एका अज्ञात व्यक्तीने पोलीस ठाण्यात फोन केला आणि शुभांगीची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, मृत शुभांगीच्या हत्येबाबत काही पुरावे सापडले असून यामुळे तपासाला गती मिळाल्याची प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.