पिंपरी : चिंचवड मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी अचानक जगताप यांच्या घरी भेटीला आले होते. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे फडणवीस हे लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांची मनधरणी करण्यासाठी थेट दिल्लीहून कुठलाही दौरा नसताना दाखल झाले.
शंकर जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत आणि पक्ष जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल अशी भूमिका त्यांनी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस हे अचानक जगताप यांच्या घरी भेटीसाठी आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.