अहमदनगर : नगर जिल्ह्यात कोणत्याही निवडणुकांमध्ये प्रभाव पाडणारी शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय यंत्रणेने अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्याच पाठीशी राहण्याचे ठरवल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्याशी संबंधीत या यंत्रणेतील कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून आपल्या सोशल मीडिया स्टेटसवरून तांबे यांना पाठिंबा दिला आहे. भाजपचा अधिकृतपणे निर्णय आणि आदेश नसला तरी अंतर्गत सूचनांवरून कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासंबंधी भाजपचा अधिकृत निर्णय शेवटपर्यंत होऊ शकला नाही. तांबे हे नगर जिल्ह्यातील असल्याने स्थानिक पातळीवर याचा निर्णय घ्यावा, अशा सूचना वरिष्ठांकडून आल्या होत्या. त्यानंतर अधिकृत घोषणा न करता कार्यकर्त्यांना अंतर्गत सूचना दिल्याची माहिती आहे. सकाळपासूनच भाजपशी आणि विशेषत: ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संबंधित कार्यकर्त्यांच्या सोशल मीडिया स्टेटसवरून तांबे यांचा प्रचार सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

नव्या विचारांची नांदी! पुण्यात सासूने घालून दिला नवा आदर्श; विधवा सुनेचे केले कन्यादान

हीच सर्वपक्षीय यंत्रणा नगर जिल्ह्यातील राजकारणात महत्वाची भूमिका बजावते, असे मानले जाते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश महासचिव विनायक देशमुख यांनी जिल्ह्यातील अदृष्य शक्ती महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला होता. तेव्हा त्यांचा रोख याच शक्तीकडे असावा, अशी चर्चाही सुरू झाली होती. ‘शुभांगी पाटील यांच्या पाठीशी नगर जिल्ह्यात अज्ञात शक्ती आहे. त्यामुळे पाटील यांचा विजय निश्चित आहे,’ असे देशमुख म्हणाले होते. त्यानंतर भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही नाशिक जिल्ह्यात बोलताना यासंबंधी एक वक्तव्य केले होते.

‘निरोप आला तर पदवीधर निवडणुकीचे चित्र एका रात्रीतून बदलण्याची क्षमता आहे,’ असे सुजय विखे पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरूनही चर्चा झाली होती. तर दुसरीकडे तांबे यांनी भाजपवर टीका करणे टाळले होते. पाठिंब्यासंबंधीही ते स्पष्टपणे हो किंवा नाही, असे सांगत नव्हते.

या पार्श्वभूमीवर काल रात्रीतून चक्रे फिरली. आज सकाळीच बहुतांश कार्यकर्त्यांनी डीपी आणि स्टेटस बदल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे सर्वांचे स्टेटस एकसारखेच असल्याचे दिसून येत आहे. यावर नेत्यांनी अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही. कार्यकर्त्यांच्या पातळीवर ही मोहीम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कुणीकडे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांच्या बैठकांना हजर होते. मात्र, नगर शहरासह पक्षाचे इतर आमदारही यात सहभागी झाले नव्हते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्याच्या वेळीही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके उपस्थित असले तरी इतर पदाधिकारी आणि आमदार बैठकीला नव्हते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीलाही अंतर्गत सूचना आल्या असून तांबे यांचेच काम करण्यास सांगितले आहे, अशी चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील मधुर चांगले संबंध हे यामागील कारण सांगितले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here